‘वोटकटवा’ही ठरले नाहीत पीके
संन्यासाचा शब्द पाळणार का याकडे सर्वांचे लक्ष
बिहार निवडणूक निकालासह प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या आहेत. जनसुराज पक्षाला राज्यात एकही जागा जिंकता आलेली नाही. सर्वात खास बाब म्हणजे प्रशांत किशोर यांच्या उमेदवारांना चुरशीची लढतही देता आलेली नाही. विधानसभा पोटनिवडणुकीत 10 टक्क्यांहून अधिक मते मिळविणारा प्रशांत किशोर यांचा पक्ष कमीतकमी ‘वोटकटवा’ ठरेल असे मानले जात होते, परंतु तेही घडू शकले नाही.
जनसुराजच्या सभांमध्ये प्रशांत किशोर यांना ऐकण्यासाठी होणारी गर्दी पाहून रालोआ आणि महाआघाडी दोघांनाही नुकसान होईल असा कयास वर्तविला जात होता. परंतु निकाल पाहता प्रशांत किशोर पूर्णपणे निष्प्रभ ठरले आहेत. यामुळे प्रचारादरम्यान दिलेला शब्द प्रशांत किशोर पाळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
...तर संन्यास घेईन
विधानसभा निवडणुकीत संजदला 25 हून जागा मिळणार नाही. संजदला 25 हून अधिक जागा मिळाल्या तर संन्यास घेईन, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले होते. तर पराभवाची जाणीव झाल्यावर प्रशांत किशोर यांनी आणखी 5 वर्षे जनतेत जात संघर्ष करणार असल्याचे म्हटले होते.
तेजस्वी विरोधात न लढणे
तेजस्वी यादव यांना ‘चॅलेंज’ देत माघार घेण्याचा प्रशांत किशोर यांचा निर्णय जनसुराजसाठी आत्मघाती ठरला आहे. किशोर हे बिहारला ‘नवा राजकीय सूर्य’ देण्याचा दावा करत होते, परंतु स्वत:ला पर्यायी नेता म्हणून स्थापित करण्याच संधी त्यांनी गमाविली. प्रशांतकिशोर यांनी 9 ऑक्टोबर रोजी राघोपूर मतदारसंघात तेजस्वी यादवांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. परंतु निवडणूक नजीक येताच त्यांनी माघार घेतली होती.
मोदी-शाह विरोधात टिप्पणी टाळली
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यासारख्या राष्ट्रीय नेत्यांना थेट लक्ष्य करणे प्रशांत किशोर यांनी टाळले. यामुळे किशोर हे भाजपची बी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप होऊ लागला. प्रशांत किशोर यांनी भाजप नेते सम्राट चौधरी आणि संजद नेते अशोक चौधरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, परंतु त्याचे पुरावे सादर केले नाहीत.
जातीय राजकारणाचा अवलंब
जातींचे राजकारण करणार नसल्याचे म्हणणारे प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये तिकीटवाटपात जात अन् धर्माच्या नावार उमेदवारांची निवड केली. जनसुराज पक्ष पारदर्शकता, विकास आणि जातरहित राजकारणाचे प्रतीक ठरणार असल्याचा दावा प्रशांत यांनी केला होता. परंतु निवडणुकीसाठी त्यांनी अवलंबिलेले धोरण विरोधाभासाचे होते.
मद्यबंदीला विरोध
प्रशांत किशोर यांनी मद्यबंदीला विरोध करत महिलांना स्वत:च्या विरोधात उभे केले. राजदने देखील मद्यबंदीच्या निर्णयाचा सत्तेवर आल्यास आढावा घेऊ अशी मध्यममार्गी भूमिका घेतली होती. तर किशोर यांनी सत्तेवर आल्याच्या 24 तासांमध्ये मद्यबंदी संपुष्टात आणण्याचे आश्वासन दिले होते. 2016 पासून लागू नितीश कुमारांचे मद्यबंदी धोरण महिलांची सुरक्षा आणि कौटुंबिक सुख-शांतीचे प्रतीक ठरले आहे.