तडीपार गुंडांकडून पिस्टल, मॅग्झीन, काडतुसे जप्त
सातारा :
निरा ते लोणंद जाणाऱ्या रस्त्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या मोक्क्यातून जामीनावर असलेल्या दोन तडीपार गुंडांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. त्याच्याकडून 6 पिस्टल, 6 मोकळया मॅग्झीन, 30 जिवंत काडतुसे, मोबाईल व कार असा एकूण 15 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमित ऊर्फ बिऱ्या रमेश कदम (वय 32, रा. लोणी, ता. खंडाळा), विशाल महादेव चव्हाण (वय 30, रा. भोळी, खंडाळा) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना माहिती मिळाली की, मोक्क्यातून जामीनावर सुटलेले व सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेले अमित ऊर्फ बिऱ्या कदम व विशाल महादेव चव्हाण हे त्यांच्याकडील राखाडी रंगाची कार (एमएच-12-टीएस-1889) मधून निरा ते लोणंद जाणाऱ्या रोडवर देशी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतुसे विक्री करण्याकरीता येणार आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रोहित फाणे यांना त्यांच्या पथकासह या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तपास पथकाने लोणंद ते निरा जाणारे रोडवरील रेल्वे पुलावर सापळा लावला.
कारमधील तडीपार गुंड अमित व विशाल यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 6 देशी बनावटीची पिस्टल, 6 मोकळ्या मॅग्झीन, 30 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल हॅण्डसेट व कार असा एकूण 15 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोघांवर लोणंद पोलीस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगून तडीपारीचा भंग केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परितोष दातिर, विश्वास शिंगाडे, सहायक फौजदार अतीष घाडगे, पोलीस हवालदार विजय कांबळे, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ, अमित माने, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, मोहन पवार, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर, लोणंद पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक घुले, धुमाळ, नाना भिसे, अतुल कुंभार, सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल यशवंत घाडगे यांनी केली.