सराईताकडून पिस्टल आणि काडतुसे हस्तगत
सातारा :
वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सराईत गुन्हेगाराकडून 1 देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा 65 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत केला आहे. आरोपी कुणाल सकटे (रा. रविवार पेठ, वाई) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परि. पोलीस उपअधिक्षक श्याम पानेगांवकर यांना माहिती मिळाली की, एक सराईत आरोपी हा वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील रविवारपेठेतील मांगखळी येथे विनापरवाना अग्निशस्त्र घेऊन फिरत आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व त्यांचे पथकास या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचुन संशयिताला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. पथकाने रविवार पेठ वाई मधील मांगखळी येथील मणेश्वर ओढ्याचे जवळ सापळा लावला असता या ठिकाणी एक इसम हा संशयितरितीने फिरताना दिसला. त्याचा वाजवी संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव कुणाल सकटे असे असल्याचे सांगितले. त्याच्यावर यापुर्वी देखील गुन्हा दाखल असल्याने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला 1 देशी बनावटीचे पिस्टल व त्याचे पॅन्टचे खिशात 2 जिवंत काडतुसे मिळून आले.
ही कारवाई ही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्याम पानेगांवकर परि. पोलीस उपअधिक्षक वाई पोलीस ठाणे. सहायक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस उपनिरीक्षक ए. बी. सुर्वे पोलीस अंमलदार प्रसाद दुदुस्कर, पोलीस शिपाई नितीन कदम, राम कोळी, हेमंत शिंदे, श्रावण राठोड, विशाल शिंदे यांनी केली आहे.