पिरनवाडी उरूसाची उत्साहात सांगता
वार्ताहर/किणये
पिरनवाडी येथील हजरत शहा सद्रोद्दीन अन्सारी उर्फ जंगली पीर उऊस मोठ्या उत्साहात झाला. उरुसामध्ये भाविकांची अलोट अशी गर्दी झाली होती. पिरनवाडीतील हा उरूस हिंदू मुस्लीम बांधवांचे एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे हा उरूस मोठ्या भक्तीभावाने झाला. या उरुसामध्ये भक्तांची दर्शनासाठी लक्षणीय गर्दी दिसून आली. बुधवारी रात्री 11 वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात संदल मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लाठीमेळा झाला. संदल मिरवणूक फिरल्यानंतर गुरुवारी पहाटे दर्ग्यामध्ये संदल चढविण्यात आली. त्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर दिवसभर दर्शनाचा भक्तांनी लाभ घेतला
सांस्कृतिक-कवाली कार्यक्रम
गुरुवारी सायंकाळी अरबी मदरसा यांच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता कवालीचा कार्यक्रम झाला. कवालीची जुगलबंदी मदरसाच्या बाला मशहूर व माऊफ यांच्यामध्ये झाला. कवालीमध्ये एकापेक्षा एक अशी कवाली गीत सादर करून उपस्थितांचे मनोरंजन करण्यात आले. शुक्रवारी पुन्हा दिवसभर भाविकांची दर्गा परिसरात दर्शनासाठी गर्दी झाली होती. शनिवारी रात्री नऊ वाजता महालिंगपूर येथील निजामुल्ला खान यांचा कवालीचा कार्यक्रम झाला.
विविध प्रकारचे उभारले होते स्टॉल
कवालीच्या जुगलबंदी कार्यक्रम पाहण्यासाठी नेहमीची गर्दी असते. यावषीही तसाच प्रतिसाद लाभला. उरुसानिमित्त दर्गा परिसरात विविध प्रकारचे खेळण्याचे स्टॉल, खाऊचे स्टॉल उभारण्यात आले होते. विविध प्रकारची साहित्य खरेदीसाठी ठेवण्यात आली होती. याची खरेदी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात करताना दिसत होत्या. तसेच मनोरंजनाचे कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आले होते. रविवारी सर्वांना सुट्टीचा दिवस असल्यामुळे परिसरात अलोट गर्दी दिसून आली. या उरुसाची मोठ्या उत्साहात सांगता झाली.