Kolhapur News: 'माझी बदनामी करा, परंतु पिराचीवाडीच्या बदनामीचे षडयंत्र थांबवा'
हनुमान मंदिराच्या महिला भक्तनिवासाच्या दोन खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे
कोल्हापूर : राजकीय द्वेषापोटी माझी जरूर तेवढी बदनामी करा. परंतु; पिराचीवाडी गावाच्या बदनामीचे षडयंत्र थांबवा, असे आवाहन माजी सरपंच सुभाष भोसले यांनी केले. पिराचीवाडी (ता. कागल) येथे प्राथमिक शाळेची सात खोल्यांची तर भक्तनिवासची दोन खोल्यांची इमारत आहे.
या दोन इमारती संलग्न असल्या तरी त्या वेगवेगळ्याच आहेत. मात्र, दोन्ही इमारती एकमेकांना लागून असल्याचा गैरफायदा घेऊन काही विघ्नसंतोषी लोकच राजकीय द्वेषापोटी जाणीवपूर्वक बदनाम करण्याच्या उद्देशाने त्याचा विपर्यास करत आहेत. ही प्रवृत्ती गावच्या विकासाला खीळ घालणारी आहे.
गावची सुरू असणारी सर्वांगीण प्रगती थांबवून विघ्नसंतोषी लोकांना काय साध्य करायचे आहे? असा खडा सवाल माजी सरपंच सुभाष भोसले यांनी केला आहे. हनुमान मंदिराचे भक्तनिवास हे प्राथमिक शाळेला लागून आहे. परंतु, शाळेची इमारत आणि भक्तनिवासची इमारत या स्वतंत्र आहेत.
प्राथमिक शाळेच्या दोन खोल्या 25/15 योजनेतून आणि जिल्हा वार्षिक योजनेतून पाच खोल्या, अशा सात खोल्यांची स्वतंत्र इमारत आहे. प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्यातून हनुमान मंदिर व महादेव मंदिर परिसरात भक्तनिवास मंजूर झाले आहे. यापैकी हनुमान मंदिराच्या महिला भक्तनिवासाच्या दोन खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
महिलांच्या सुरक्षा व सोयीच्यादृष्टीने प्राथमिक शाळेनजीक उपलब्ध जागेत बांधकाम केले आहे. तसेच, केवळ 50 फुटांवरच स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. महादेव मंदिरानजीक पुरुष भाविकांच्या सोयीसाठी भक्तनिवास बांधले आहे.
यामध्ये असणाऱ्या अपुऱ्या सोयी-सुविधांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून निधी उपलब्ध झाल्यानंतर या सोयीही पूर्ण करणार आहोत. या कामासहित सर्वच विकासकामे आमचे नेते मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या प्रयत्नातून व मार्गदर्शनातून झाली आहेत.
यावेळी कल्पना पाटील, नामदेव पाटील, संभाजी गौड, ज्ञानदेव पाटील, वसंत रोडे, जीवन भोसले, कृष्णात भोसले, रामदास भोसले, एच. डी. भोसले, दत्तात्रय भोसले, संतोष सावंत, पांडुरंग भोसले, तानाजी डावरे, सातापा डावरे, उमाजी भोसले, अर्जुन भोसले, युवराज माने, दत्तात्रय दाभोळे आदी उपस्थित होते.
कधीतरी याचीही माहिती घ्या....!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक बुरुजावर शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे स्वप्न गावकऱ्यांनी उराशी बाळगले आहे. लोकसहभागातूनच बुरुजाचा झालेला जिर्णोद्धार तसेच शिवसृष्टीचा समतोल राखण्यासाठी लोकसहभाग व श्रमदानातून प्रत्येक वर्षी वृक्षारोपण व त्याचे संगोपन केले जाते.
गावातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी माजी सरपंच सुभाष भोसले यांच्याकडून स्वमालकीच्या योजनेतून गावासह ठिबकद्वारे वृक्षांना मोफत पाणीपुरवठा केला जात आहे. विघ्नसंतोषी प्रवृत्तींनी कधीतरी याचीही माहिती घ्यावी, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली.
पिराचीवाडीचा विकास सुरुच राहणार
जिल्हा परिषदेचा एक निलंबित भ्रष्ट अधिकारी व गावातील काही निवडक अपप्रवृत्ती गावच्या सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत झालेला दारुण पराभव पचवू शकत नाहीत. म्हणूनच गावातील विकासामध्ये वारंवार विघ्न आणत आहेत. त्यांच्या कोणत्याही प्रयत्नांना भीक न घालता पिराचीवाडीचा विकास यापुढेही अखंड सुरू राहिल. केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात नावलौकिक असणाऱ्या गावाला बदनाम करण्याचे षडयंत्र आम्ही ग्रामस्थ हाणून पाडू.
"गावातील सर्व विकासकामे शासनाच्या नियमानुसायच सुरू असून दर्जेदार केली जात आहेत. विविध योजना व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गावात अनेक विकासकामे होत आहेत. यामुळे गावचा नावलौकिक झाला आहे. त्याला बाधा न आणता सर्वच गावकऱ्यांनी सहकार्य करावे."
- सौ. कल्पना सुभाष भोसले, लोकनियुक्त सरपंच, पिराचीवाडी
"आमच्या शाळेच्या खोल्या आणि भक्तनिवासच्या दोन खोल्या या स्वतंत्रच आहेत. असे असताना शाळेच्या अख्ख्या इमारतीचा फोटो छापून आमच्या शाळेची नाहक बदनामी करणे योग्य नाही. शाळेकडे कागदोपत्री किती खोल्या आहेत आणि किती खोल्या वापरात आहेत, याचीही माहिती घ्यावी."
- नाथाजी भोसले, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती