Pink Riksha Kolhapur: बंध मायेचे ... बंध मजबुरीचे!
ममता आणि मजबुरीचं बंधन! पोटाशी ४ वर्षांचा स्वरूप आणि हातात पिंक रिक्षाचं हॅण्डल
By - गौतमी शिकलगार
कोल्हापूर: शहरातील रस्त्यांवर धावणाऱ्या गुलाबी रंगाच्या 'पिंक रिक्षा'कडे पाहिलं की, महिलांच्या सक्षमतेची आणि आत्मनिर्भरतेची एक वेगळी भावना मनात येते. पण, यामागे एक कहाणी दडलेली असते. तशीच एक कहाणी आहे मनोरमा पवार हिची, जिचे हात रिक्षाच्या हॅण्डलवर आहेत. हिच्याकडं पाहिलं की, डोळ्यांत पाणी येतं आणि मन आदरानं झुकतं. कारण, मनोरमा रोज आपला चार वर्षांचा स्वरूप, खेळण्याच्या वयातल्या निष्पाप पिल्ल्याला आपल्या पोटाशी घट्ट बांधून रिक्षा चालवते.
मनोरमा यांच्यासारख्या असंख्य महिलांसाठी, ही पिंक ई-रिक्षा योजना एक मोठा आधार ठरली आहे. महिला व बालविकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेली ही योजना गरजू महिलांना रोजगारासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्याचबरोबर महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवासासाठी राबवली जात आहे.
ममता आणि मजबूरीचा कठोर त्याग
याच योजनेमुळे मनोरमा यांना रिक्षा खरेदीसाठी मोठं अर्थसहाय्य मिळालं. पती नोकरीवर असले तरी, मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी आणि वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या कुटुंबांच्या अपेक्षांचा भार मनोरमा एकटी उचलत आहे. ही आर्थिक गरज त्यांना थांबवत नाही.
पण, ज्या योजनेने आधार दिला, त्याच रिक्षातून कमाई करण्यासाठी त्यांना त्यांच्या मातृत्वाचा कठोर त्याग करावा लागला आहे—तो म्हणजे आपल्या ४ वर्षांच्या मुलाला दिवसभर स्वतःसोबत बांधून ठेवणे. ती रिक्षा धावते तेव्हा, रिक्षाच्या इंजिनच्या आवाजापेक्षाही मोठा आवाज येतो तो आईच्या हृदयाच्या धडधडीचा. स्वरूपला दिवसभर बांधून ठेवण्याची ही ममतेची मजबूरी तिच्या काळजाला रोज खोलवर जखम करते. स्वरूपच्या निरागस चेहऱ्याकडे बघून, प्रत्येक आईच्या संघर्षाची ही कहाणी मनोरमाच्या रिक्षातून जिवंत होते.
स्वरूपचा रिक्षातील एकांत आणि खेळण्याची ओढ
मनोरमाचा संघर्ष फक्त शारीरिक नाही, तर मातृत्वाचा आणि भावनिक आहे. रोज सकाळी ४ वर्षांच्या स्वरूपला जेव्हा पोटाशी बांधलं जातं, तेव्हा 'आई, मला खेळायचं आहे!' असा त्याचा हट्ट ऐकून मनोरमाचे हृदय पिळवटून निघतं. तिला माहितीये की, खेळण्याच्या वयात तिझं पोर तिच्या कर्तव्याच्या धाग्यानं दिवसभर बांधलेल असतं.
रस्त्यावरील गर्दीत रिक्षा चालवताना, स्वरूपचा खेळ म्हणजे रिक्षामधून बाहेरच्या जगाकडं पाहत बसणं. रस्त्यावर इतर मुले खेळताना दिसली की, तो निरागसपणे "आई, मला खेळायचं आहे! मला या रस्त्यावर खाली उतरून धावायचं आहे!" असा हट्ट धरतो.
पण रिक्षात प्रवासी असल्यामुळं आणि त्यांना वेळेत त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असल्यामुळ, मनोरमा रिक्षा थांबवून त्याला साधं खेळण्याचं स्वातंत्र्यही देऊ शकत नाही. हे बंधन, रिक्षातील त्याचा हा जीवघेणा एकांत, मनोरमाच्या डोळ्यांतील हतबलता स्पष्ट करतो. आई-मुलामधील हे अंतर आणि तिची मजबूरी तिला क्षणोक्षणी बोचत राहते.
संघर्षातून साकारतोय सकारात्मक आदर्श
दुपारच्या वेळेत जेवणासाठी रिक्षा थांबते आणि मनोरमा स्वरूपला हळूच मोकळं करते. चार वर्षांचा स्वरूप लगेच पिंजऱ्यातून सुटलेल्या पाखरासारखा मोकळ्या जागेत धावायला लागतो. त्याचं ते निरागस धावणं बघितलं, की मनोरमाचा सगळा थकवा एका क्षणात गायब होतो. पण, काही वेळातच त्याला पुन्हा बांधून कामाला लागावं लागतं. हा रोजचा संघर्ष तिच्या नशिबात चुकलेला नाही.
कोल्हापूर जिल्ह्यासाठी शासनाने २०० रिक्षा मंजूर केल्या असताना, अनेकींना रिक्षा चालवण्याची जबाबदारी आणि मुलाला सांभाळण्याची धास्ती वाटत होती. मात्र, मनोरमासारख्या अग्रणी महिलांनी हे सिद्ध केले आहे की हा संघर्ष मोठा असला तरी, तो अशक्य नाही! त्यांच्या या संघर्षाकडे पाहून, इतर महिलांना आता अर्ज करण्याचे नवे बळ मिळत आहे.
रात्री थकून घरी परतल्यावर स्वरूपला अंथरुणावर ठेवताना मनोरमाचे डोळे पाणावतात. ती त्याला वचन देते, "बाळा, हे बंधन तात्पुरते आहे. तुझा त्याग व्यर्थ जाणार नाही. हा 'पिंक रिक्षा'चा प्रवास तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठीचा पहिला टप्पा आहे!"
मनोरमा पवार जिच्या रिक्षाच्या हॅण्डलवर कुटुंबाच्या गरजा आणि एका निरागस मुलाचे भविष्य बांधलेले आहे. हा प्रवास फक्त एका रिक्षाचालकाचा नाही, तर लाखो आयांच्या त्यागाची, जिद्दीची आणि दुर्दम्य आशावादाची ती सोनरी गाथा आहे.
मनोरमा पवार हिच्या त्या ममतामयी संघर्षाला आणि त्यांच्या अपार कर्तृत्वाला तरुण भारतकडून कोटी-कोटी सलाम!