For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘पिंक सेंटर्स’.... महिला क्रिकेटच्या प्रगतीसाठी जीसीएची कटिबद्धता

06:30 AM Jul 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘पिंक सेंटर्स’     महिला क्रिकेटच्या प्रगतीसाठी जीसीएची कटिबद्धता
Advertisement

महिला क्रिकेटच्या विकासासाठी आपली कटिबद्धता अधिक दृढ करत, गोवा क्रिकेट संघटनेने राज्यभरात ‘पिंक सेंटर्स’ सुरू केली असून त्यांना लहान मुलींचा तसेच होतकरू महिला क्रिकेटपटूंचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. गोवा क्रिकेट संघटनेची ही केंद्रे उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूंचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना घडवण्यासाठी विशेष प्रशिक्षण केंद्रे म्हणून सध्या काम करत आहेत.

Advertisement

जीसीएच्या या उपक्रमाची सुरूवात पर्वरी क्रिकेट अकादमीमध्ये पहिल्या ‘पिंक सेंटर’च्या उद्घाटनाने झाली. त्यानंतर उत्तर गोव्यातील महिला क्रिकेटपटूंसाठी  संधी वाढवण्याच्या उद्देशाने साखळीत दुसरे केंद्र सुरू करण्यात आले. मडगावातील प्रसिद्ध मडगाव क्रिकेट क्लबवर सुरू झालेले नवीनतम केंद्र हे दक्षिण गोव्यातील पहिले समर्पित पिंक सेंटर ठरले, ज्यामुळे राज्यभरातील मुलींसाठीच्या पद्धतशीर क्रिकेट प्रशिक्षणाचा विस्तार झाला आहे.

पिंक सेंटर्सचा उद्देश व्यावसायिक प्रशिक्षण, सरावासाठी दर्जेदार सुविधा आणि प्रतिभावन महिला क्रिकेटपटूंना तळागाळापासून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांपर्यंत प्रगत करण्यासाठी स्पष्ट मार्ग उपलब्ध करून देणे हा आहे, असे जीसीएचे अध्यक्ष आणि माजी रणजीपटू महेश देसाई म्हणाले. या उपक्रमामुळे क्रिकेटमधील मुलींचा सहभाग वाढेल आणि भविष्यात गोव्यातील महिला क्रिकेटपटूंची फळी अधिक सक्षम होणार आहे.

Advertisement

गोवा क्रिकेट संघटना राज्य महिला क्रिकेटसाठी एक शाश्वत परिसंस्था निर्माण करण्यास कटिबद्ध आहे. भारतात महिला क्रिकेट एका नवीन युगात प्रवेश करत आहे आणि गोव्यानेही या प्रवासाचा भाग बनला पाहिजे. जीसीएचे अध्यक्ष महेश देसाई म्हणतात, की पिंक सेंटर्स ही केवळ प्रशिक्षणांची ठिकाणे नसून ती संधींची केंद्रे आहेत, जिथं तरूण मुली स्वप्न पाहू शकतात, स्वत:चा विकास करू शकतात आणि सर्वोच्च स्तरावर जाऊन स्पर्धा करू शकतात. गोव्यातील प्रत्येक प्रतिभावंत मुलीला दर्जेदार प्रशिक्षण मिळावे व कालांतराने देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचा मार्ग उपलब्ध व्हावा, ही गोवा क्रिकेट संघटनेची इच्छा असून हा उपक्रम अधिक विस्तारणे आणि महिला क्रिकेटला पूर्वीपेक्षा अधिक बळकट करणे हे जीसीएचे ध्येय असल्याचे महेश देसाई म्हणाले.

राज्यात या पिंक सेंटर्सना मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे आणि त्यातून संपूर्ण राज्यातून महिलांच्या क्रिकेटबद्दल वाढती आवड दिसून येते. पिंक सेंटर हा उपक्रम महिला क्रिकेटच्या भविष्यातील वाटचालीसाठी केलेली एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे. गोव्यातील विविध भागांमध्ये स्वतंत्र केंद्रे सुरू करून, उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूंसाठी दर्जेदार प्रशिक्षणाची सुविधा आम्ही अधिक सुलभ केली आहे, असे जीसीएचे सचिव तुळशीदास शेट्यो म्हणतात.

तळागाळातील गुणवत्ता शोधणे, त्यांना योग्य मार्गदर्शन पुरवणे आणि मुलींना उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी उपलब्ध करून देणे यावर जीसीएचा सध्या भर आहे. गोव्यातून महिला क्रिकेटपटूंची पुढील पिढी घडवण्यात ही पिक सेंटर्स महत्वाची भूमिका बजावतील. जीसीएची राज्यात आणखी चार पिंक सेंटर्स सुरू करण्याची जीसीएची भावी योजना असून यावरून महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याच्या आणि तरूण महिला खेळाडूंसाठी अधिक संधी निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला गोवा क्रिकेट असोसिएशन अधिक बळकट करत असल्याचे दिसून येत आहे.

जीसीएने या उपक्रमाचा मुख्य भर दिला आहे तो केवळ मुली आणि महिलांसाठी पद्धतशीर प्रशिक्षणाची सोय करण्यासाठी. याव्यतिरिक्त तळागाळातील स्तरावर महिला क्रिकेटपटूंचा क्रिकेटमधील सहभाग वाढवणे, प्रतिभावन तरूण महिला क्रिकेटपटूंचा शोध घेणे आणि त्यांना घडवणे, उत्तम प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे तसेच जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमध्ये पुढे जाण्याच्या संधी निर्माण करणे या आहेत. जीसीए या सर्व बाबींवर काम करत आहे. हा उपक्रम महिला क्रिकेटची पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या आणि राज्यातील महिला संघांसाठी प्रतिभावन क्रिकेटपटूंचा एक ‘टॅलेंट पूल’ तयार करण्याच्या जीसीएच्या व्यापक प्रयत्नाचा एक भाग आहे.

जीसीएला पिंक सेंटर्सना एक शाश्वत, प्रोफेशनल आणि उच्च-स्तरीय महिला क्रिकेट विकास कार्यक्रम बनवायचा आहे. आम्ही या सेंटर्सना केवळ प्रशिक्षण केंद्रे म्हणून न पाहता, एक संपूर्ण खेळाडू विकास परिसंस्था म्हणून बघत आहोत, असे सचिव तुळशीदास शेट्यो म्हणतात.

जीसीएच्या धोरणात्मक आराखड्यानुसार एक स्पष्ट दृष्टीकोन तयार करण्यात आलेला आहे. एका संरचित दीर्घकालीन खेळाडू विकास मार्गाद्वारे गोव्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊ शकणाऱ्या महिला क्रिकेटपटूंना ओळखणे, त्यांना विकसित करणे आणि तयार करणे हे आहे. पिंक सेंटर्स हे गोव्याच्या महिला क्रिकेट प्रणातील आता प्रवेशद्वार बनणार आहे. यासाठी एक संरचित खेळाडू मार्ग स्थापित करणे, क्रिकेट प्रशिक्षण पथके, जीसीए उच्च कार्यक्षमता अकादमी, क्रिकेटपटूंच्या वयानुसार प्रशिक्षणाची विभागणी तसेच प्रत्येक खेळाडूला आपल्या मार्गाची माहिती देणे, म्हणजे आपलं शिखर गाठण्यासाठी 15, 19 वर्षांखालील, राज्य संघ, सीनियर महिला आयपीएल, भारत ‘अ’ आणि भारत असा प्रवास करावा लागेल. झटपट काहीच मिळत नाही आणि उच्चस्तरीय क्रिकेट खेळण्यासाठी संयम, शिस्त आणि कठोर परिश्रम महत्वाचे आहेत व यावरही पिंक सेंटर्समध्ये जास्त भर जीसीएने दिला आहे, असे शेट्यो म्हणतात.

जीसीएचे अध्यक्ष महेश देसाई यांच्या मते, सर्वांत यशस्वी महिला क्रिकेट प्रणाली खेळाडूंच्या विकासाला केवळ स्वतंत्र प्रशिक्षण सत्रांऐवजी एक समन्वित प्रक्रिया आहे. जीसीएच्या पिंक सेंटर्समधून प्रशिक्षण, नियमित क्रिकेट स्पर्धा, पात्र सपोर्ट स्टाफ, डेटा-आधारित खेळाडू निरीक्षण, क्रीडा विज्ञानाचे सहाय्य आणि प्रगतीचे स्पष्ट मार्ग असलेल्या राज्यव्यापी नेटवर्कमध्ये विकसित होऊ शकतात. जीसीएच्या या दृष्टिकोनांमुळे गोव्यात महिला क्रिकेटपटूंचा केवळ सहभागच वाढणार नाही, तर गोव्यातून उदयास येणाऱ्या प्रतिभेची गुणवत्ता आणि सातत्यही सुधारेल, ज्यामुळे राज्यात महिला क्रिकेटमधील दीर्घकालीन यशासाठी एक मजबूत पाया तयार होईल.

पिंक सेंटर्सचे यश हे केवळ किती केंद्रे सुरू झाली यावरून मोजले जाणार नाही, तर त्यातून किती दर्जेदार महिला क्रिकेटपटू घडल्या, यावरून मोजले जाईल. यासाठी पात्र प्रशिक्षक, खेळाडूंच्या विकासाची सुनियोजित प्रक्रिया, नियमित स्पर्धा, क्रीडा-विज्ञानाची मदत, शारीरिक तंदुरूस्ती, कामगिरीचे मूल्यमापन आणि प्रगतीचा स्पष्ट मार्ग यांचा समावेश असला पाहिजे. जीसीएने आपल्या पिंक सेंटर उपक्रमात या घटकांच अंतर्भाव केला आहे. यामुळे गोव्यातील महिला क्रिकेटचे रूपांतर एका ‘हाय-परफॉर्मन्स’ प्रणालीमध्ये होणार असून, जी राज्य, राष्ट्रीय आणि प्रोफेशनल स्तरावर सातत्याने क्रिकेटपटू घडवण्यास सक्षम असेल.

संदीप मो. रेडकर

Advertisement
Tags :

.