पिंगळी तलाव पूर्णक्षमतेने भरला
दहिवडी :
माण तालुक्यातील दहिवडी जवळ असणारा ब्रिटिश काळातील पिंगळी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून तलावाचे विहंगम दृश्य मंदिराच्या टेकडीवरुन पाहण्यासाठी लोक गर्दी करु लागले आहेत.
ब्रिटिश राजवटीत त्यावेळी दुष्काळ पडत असल्याच्या कारणामुळे दहिवडी शहराच्या हद्दीवर पिंगळी येथे तलाव बांधला. महाराणी व्हिक्टोरियाने बांधलेला पिंगळी तलाव दुष्काळी तालुक्यातील अनेक गावांना वरदान ठरतो. महाराणी व्हिक्टोरिया यांनी त्यावेळी तलाव बांधला. सन १८७६/७७च्या दुष्काळात लोकांना काम मिळावे म्हणून मुख्य हेतूने याची उभारणी केली होती. २.२८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ०.०८४ 'टीएमसी' एव्हढा पाणीसाठा या तलावात आहे.
अनेक ओढे, नाले या तलावाला येऊन मिळतात. फक्त पावसाच्या पाण्यावर पिंगळी तलाव काही दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यावरुन पाणी वाहत आहे.
पिंगळी तलावाच्या खाली दहिवडी व गोंदवलेसह अनेक गावांना पाणी पिण्यासाठी जाते तसेच शेतीसाठी पाणी सोडण्याची व्यवस्था केली गेली आहे.
- कॅनॉल अतिक्रमणाच्या विळख्यात...
नैसर्गिक व भौगोलिक रचनेवर कमी खर्चात माणगंगा नदीच्या पात्रातून बिदाल येथून नदीचे पाणी पिंगळी तलावाकडे जाण्यासाठी सोय केली गेली आहे. परंतु बिदालपासून पिंगळीपर्यंत नदीचे पाणी कॅनालमधून कित्येक वर्षात कधी ही पिंगळी तलावात सोडले गेले नाही. दहिवडी शहरातून पिंगळी तलावाकडे जाणारा हा कॅनॉल मुळातच अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. शहरातील सांडपाणी ही याच कॅनालमध्ये नागरिक सोडत आहेत. त्यामुळे कॅनालचा परिसर दुर्गंधीयुक्त झाला आहे. या कॅनालचा कित्येक वर्ष उपयोगच झालेला नाही. या कॅनालमधून नदीतून येणारे पाणी बंद आहे. कॅनॉलमध्ये झाडे झुडपे वाढली असून सर्वत्र दुर्गंधी आहे. कॅनॉल स्वच्छ करण्याची मोहीम पाटबंधारे विभागाने हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.