पाइन लॅब्जचा आयपीओसाठी सेबीकडे अर्ज दाखल
2600 कोटी उभारण्याची कंपनीची तयारी
नवी दिल्ली :
फिनटेक क्षेत्रातील कंपनी पाइन लॅब्ज आयपीओच्या माध्यमातून 2600 कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यासंदर्भातला सविस्तर अर्ज आवश्यक कागदपत्रांसह कंपनीने बाजारातील नियामक सेबीकडे दाखल केला आहे. सदरच्या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 147.8 दशलक्ष समभागांची विक्री करणार आहे. सदरची कंपनी पॉईंट ऑफ सेल मशीन ते व्यापाऱ्यांपर्यंत कार्ड पेमेंटच्या माध्यमातून व्यवसाय करते आहे. पेटीएम आणि वॉलमार्टची फोन पे या कंपन्यांबरोबर ही कंपनी स्पर्धा करते आहे.
काय करणार रक्कमेचे
कंपनी सदरच्या आयपीओतून उभारलेल्या रकमेचा वापर विदेशातील केंद्रांसाठी आणि तंत्रज्ञान विकासासाठी त्याचप्रमाणे कर्जाचे प्रमाण कमी करण्यासाठी करणार असल्याची माहिती मिळते आहे. पेपाल, मास्टरकार्ड, पीक एक्सव्ही पार्टनसं व मॅक्रीटीक इन्वेस्टमेंट या गुंतवणूकदारांकडून 14.78 कोटींचे समभाग विक्री केले जाणार आहेत.
व्यवस्थापन कोणाकडे
आयपीओचे व्यवस्थापन अॅक्सिस कॅपिटल, मॉर्गन स्टॅन्ले, सिटी, जे. पी. मॉर्गन व जेफरिज यांच्याकडे असणार असल्याचे समजते. एप्रिल 2022 मध्ये कंपनीचे मूल्य 5 अब्ज डॉलर्सचे होते.