'मृत्यूनंतर आपली आठवण येत राहिली असती, त्यामुळे त्यालाही सोबत घेऊन जात आहे'; मुलासह आयुष्याचा शेवट करणाऱ्या आईची मन सुन्न करणारी सुसाईड आली समोर
एकता मनोज भांगड (वय ३३) आणि माधव मनोज भांगड (वय ६) अशी मृत मायलेकांची नावे आहेत. एकता या गृहिणी होत्या, तर त्यांचे पती मनोज भांगड हे येरवडा येथील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करतात. मूळचे राजस्थान येथील असलेले भांगड कुटुंब गेल्या दोन वर्षांपासून डांगे चौकातील सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये राहत होते.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली हालचाल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी एकता या मुलगा माधव याला सोबत घेऊन लिफ्टने इमारतीच्या १८ व्या मजल्यावर जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्या. काही वेळानंतर इमारतीच्या अंतर्गत डक्टच्या परिसरातून मोठा आवाज ऐकू आला. आवाजामुळे सोसायटीतील रहिवासी खाली आले असता, एकता आणि माधव हे दोघेही गंभीर अवस्थेत पडलेले दिसले. त्यानंतर रहिवाशांनी तातडीने वाकड पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक तपासात दोघेही १८ व्या मजल्यावरून खाली पडल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी तपासादरम्यान गॅलरीजवळ दोघांच्या चपला आढळल्याची माहितीही समोर आली होती.
मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आजारपणाचा उल्लेख
घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली. संबंधित चिठ्ठीत एकता यांनी आपण दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त असल्याचा उल्लेख केल्याची माहिती आहे. आपल्या मृत्यूनंतर मुलाला आईची सतत आठवण येत राहील, अशी भीती व्यक्त करत त्यालाही सोबत घेण्याचा निर्णय घेतल्याचे चिठ्ठीत नमूद असल्याचे सांगण्यात येत आहे.
या चिठ्ठीतील मजकूर समोर आल्यानंतर घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. मात्र, चिठ्ठीतील मजकूर आणि घटनेमागील परिस्थिती यांची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. महिलेच्या आजारपणाचे स्वरूप, तिची वैद्यकीय पार्श्वभूमी आणि या घटनेपूर्वीच्या परिस्थितीचा तपास केला जात आहे.
फॉरेन्सिक पथकाकडून तपास; शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवले
घटनेनंतर पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. पथकाच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) पाठवण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणाचा वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत. चिठ्ठीतील मजकूर, सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर संबंधित बाबींची पडताळणी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेबाबत अधिक स्पष्टता येणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सिग्नेचर पार्क सोसायटी आणि डांगे चौक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
