For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सवात गुंडगिरीला आळा; पिंपरी-चिंचवडमध्ये 2,573 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

07:25 PM Sep 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
गणेशोत्सवात गुंडगिरीला आळा  पिंपरी चिंचवडमध्ये 2 573 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
Advertisement

पिंपरी : गणेशोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत शहरातील चारही परिमंडळांत करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 2,573 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

Advertisement

या मोहिमेदरम्यान गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 58 सराईत गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्यात आले. तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या 2 व्यक्तींवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

परिमंडळ 4 मध्ये सर्वाधिक कारवाई

पोलिसांच्या कारवाईत परिमंडळ 4 आघाडीवर राहिले. परिमंडळ 1 मध्ये 362, परिमंडळ 2 मध्ये 247, परिमंडळ 3 मध्ये 572, तर परिमंडळ 4 मध्ये तब्बल 1,392 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

Advertisement

गणेशोत्सवाच्या काळात दहशत निर्माण करण्याची किंवा शांतता भंग करण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले.

मुंबई पोलिस अधिनियमातील कलम 56 अंतर्गत 50, तर कलम 55 अंतर्गत 8 जणांना तडीपार करण्यात आले. अशा प्रकारे एकूण 58 सराईत गुन्हेगारांना शहराच्या हद्दीतून बाहेर करण्यात आले.

बंधपत्रांसह कायदेशीर नोटिसांचा बडगा

प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 126 अंतर्गत 414 जणांकडून शांतता राखण्याचे बंधपत्र घेण्यात आले. कलम 128 अंतर्गत 32, तर कलम 129 अंतर्गत 220 जणांवर कारवाई झाली.

भारतीय न्याय संहितेच्या कलम 168 अंतर्गत 1,800 जणांना कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या. बेकायदा दारूविक्रीच्या प्रकरणांत दारूबंदी कायद्याच्या कलम 93 अंतर्गत 35 जणांवर कारवाई करण्यात आली.

समाजमाध्यमांवरही पोलिसांची नजर

गणेशोत्सवाच्या काळात समाजमाध्यमांवरून अफवा, धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश किंवा आक्षेपार्ह मजकूर पसरवला जाऊ नये, यासाठी सायबर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी संशयास्पद किंवा भडकावू संदेशांवर विश्वास ठेवू नये तसेच ते पुढे पाठवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संशयास्पद प्रकार आढळल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी किंवा 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

“गणेशोत्सव उत्साहात साजरा करा; मात्र कायदा हातात घेऊ नका. दहशत, हुल्लडबाजी किंवा गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. भडकावू संदेश पुढे न पाठवता त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी,” असे पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.