For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

लिफ्टने १८ व्या मजल्यावर गेल्या, गॅलरीत चपला आढळल्या; आई-मुलाच्या मृत्यूने पिंपरी-चिंचवड हादरले, सीसीटीव्हीतून समोर आली महत्त्वाची माहिती

04:11 PM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
लिफ्टने १८ व्या मजल्यावर गेल्या  गॅलरीत चपला आढळल्या  आई मुलाच्या मृत्यूने पिंपरी चिंचवड हादरले  सीसीटीव्हीतून समोर आली महत्त्वाची माहिती
Advertisement
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौक परिसरातील सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एका विवाहित महिलेचा आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलाचा इमारतीवरून खाली पडल्याने मृत्यू झाला. एकता मनोज भांगड आणि माधव मनोज भांगड अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. या घटनेनंतर वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर घटनेपूर्वीची काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सिग्नेचर पार्क सोसायटीच्या इमारतीतून दोन जण खाली पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच वाकड पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी केली असता एक महिला आणि सहा ते सात वर्षांचा मुलगा गंभीर अवस्थेत आढळून आले. मात्र, दोघांचाही मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात दोघेही इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून खाली पडल्याचे समोर आले.

Advertisement

सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाची माहिती

घटनेचे नेमके कारण समजून घेण्यासाठी पोलिसांनी सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या फुटेजमध्ये एकता भांगड या मुलगा माधव याच्यासह लिफ्टमधून इमारतीच्या १८ व्या मजल्यावर जाताना दिसत असल्याची माहिती आहे. त्यानंतर १८ व्या मजल्यावरील गॅलरीजवळ दोघांच्या चपला आढळल्याचेही सांगण्यात येत आहे. या बाबींच्या आधारे पोलिसांकडून घटनाक्रमाची पडताळणी केली जात आहे. प्राथमिक तपासात दोघेही १८ व्या मजल्यावरून खाली पडल्याचे दिसून आले असले, तरी घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Advertisement

राजस्थानमधील कुटुंब; पती आयटी कंपनीत कार्यरत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांगड कुटुंब मूळचे राजस्थान येथील आहे. मनोज भांगड, त्यांची पत्नी एकता आणि मुलगा माधव असे तिघे जण सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये राहत होते. गेल्या दोन वर्षांपासून हे कुटुंब डांगे चौक परिसरात वास्तव्यास होते. मनोज भांगड हे येरवडा येथील आयटी पार्कमधील एका कंपनीत नोकरी करतात.

शुक्रवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास मनोज हे नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. त्यावेळी घरात एकता आणि त्यांचा मुलगा माधव उपस्थित होते. दिवसभरानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. इमारतीच्या अंतर्गत डक्टच्या भागातून मोठा आवाज आल्याने सोसायटीतील रहिवाशांचे लक्ष त्या दिशेने गेले. काही रहिवासी तातडीने खाली आले असता त्यांना एकता आणि माधव हे दोघेही गंभीर अवस्थेत पडलेले दिसले. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी बोलावले. पथकाच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा आणि आवश्यक पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळी आढळलेल्या वस्तू आणि इतर उपलब्ध पुराव्यांची तपासणी केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सध्या तपास सुरू असून, सर्व बाबींची पडताळणी केल्यानंतरच अधिक माहिती देता येईल. या घटनेमागे नेमके काय कारण होते, याचा शोध वाकड पोलिसांकडून घेतला जात आहे. आई आणि लहान मुलाच्या मृत्यूमुळे सिग्नेचर पार्क सोसायटीसह डांगे चौक परिसरात शोककळा पसरली आहे.

Advertisement
Tags :

.