महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पायलट-गेहलोत संघर्षाचा काँग्रेसला फटका

06:39 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

20 मतदारसंघांमध्ये विजयापासून रहावे लागले वंचित

Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

Advertisement

2018 प्रमाणेच काँग्रेसमध्ये सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात दिलजमाई असती तर यावेळी राजस्थानचा निकाल वेगळा लागू शकला असता असे आकडेवारीतून समोर आले आहे. राजस्थानात 20 जागांवर काँग्रेस केवळ पायलट आणि गेहलोत यांच्यातील भांडणामुळे पराभूत झाला आहे. दोन्ही नेत्यांमधील वादामुळे काँग्रेस 14 मतदारसंघात 14 हजारांपेक्षा कमी मतांनी पराभूत झाला. गेहलोत यांच्यासोबतच्या भांडणामुळे पायलट गटाचेही नुकसान झाले आहे. पायलट गटाचे उमेदवार नसीराबाद, विराटनगर, चाकसूमध्ये पराभूत झाले आहेत.

काँग्रेसने या 20 जागा जिंकल्या असत्या, तर राज्यातील समीकरणे बदलली असती असे जाणकारांचे मानणे आहे. राज्यातील 8 जागा अपक्षांना मिळाल्या आहेत. यातील 6 अपक्ष उमेदवार हे भाजपमधील बंडखोर होते.

बारां जिल्ह्यातील अंटा आणि छबरा या मतदारसंघात सचिन पायलट गटाचे नेते नरेश मीणा यांनी काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात भूमिका मांडली होती. हे दोन्ही मतदारसंघ मीणाबहुल होते. नरेश मीणा यांच्या बंडखोरीनंतरही पायलट आणि गेहलोत यांनी डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला नव्हता.

खंडेला मतदारसंघात पायलट हे स्वत:चे निकटवर्तीय सुभाशा मील यांना उमेदवारी मिळवून देऊ पाहत होते. परंतु गेहलोत हे महादेव खंडेला यांच्या उमेदवारीसाठी आग्रही राहिले. अशा स्थितीत सुभाष मील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत विजय देखील मिळविला आहे.

चौहटन मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार पद्माराम केवळ 1428 मतांनी पराभूत झाले. पद्माराम हे पायलट यांचे समर्थक असल्याने गेहलोत गटाने त्यांना पुरेसे पाठबळ पुरविले नसल्याचे बोलले जाते. डीडवाना मतदारसंघात अपक्ष उमेदवार युनूस खान यांनी  काँग्रेस उमेदवार चेतन डूडी यांच्यावर विजय मिळविला आहे.  डूडी हे पूर्वी पायलट यांचे निकटवर्तीय मानले जात होते, परंतु काही काळानंतर ते गेहलोत यांच्या गोटात सामील झाले होते. अशा स्थितीत पायलट समर्थक हे जाहीरपणे डूडी यांना पराभूत करण्याचे आवाहन करत होते.

डीग-कुम्हेरचे माजी आमदार महाराज विश्वेंद्र सिंह हे पराभूत झाले होते. ते पूर्वी पायलट यांचे निष्ठावंत होते, परंतु काही काळापूर्वी तेदेखील गेहलोत यांच्या गोटात सामील झाले होते. यामुळे पायलट यांनी सिंह यांच्याकरता एकही सभा घेतली नाही.

हवामहल मतदारसंघात भाजपचे नेते बालमुकुंद आचार्य यांनी काँग्रेस उमेदवार आर.आर. तिवारी यांना 974 मतांनी पराभूत केले आहे. हा मतदारसंघही पायलट आणि गेहलोत यांच्यातील गटबाजीमुळे काँग्रेसला गमवावा लागला आहे. कोटपूतली मतदारसंघात राज्याचे मंत्री राजेंद्र यादव हे 321 मतांनी पराभूत झाले आहेत. हा मतदारसंघ गुर्जरबहुल असल्याने येथे पायलट यांचा मोठा प्रभाव आहे. यावेळी पायलट येथे प्रचारासाठी फिरकलेच नाहीत.

मुस्लीम आणि गुर्जरबहुल नगर मतदारसंघात काँग्रेसने गेहलोत यांचे समर्थक वाजिब अली यांना उमेदवारी दिली होती. अली हे 1531 मतांनी पराभूत झाले आहेत. नसीराबाद मतदारसंघात पायलट यांच्या गटाचे सदस्य शिवप्रकाश गुर्जर 1135 मतांनी हरले आहेत. शिवप्रकाश यांना येथील ओबीसी समुदायाची मते मिळाली नसल्याचे मानले जाते. यामागे गेहलोत गटाचा हात असल्याचा आरोप होत आहे.

गेहलोत आणि पायलट यांच्यातील गटबाजीमुळे सवाई माधोपूरमध्ये वेगळे चित्र दिसून आले. सर्वसाधारणपणे गुर्जर आणि मीणा समुदायातील राजकीय चढाओढ येथे दिसून येते, परंतु यावेळी या दोन्ही समुदायांनी भाजपला मतदान केले आहे. सवाई माधोपूर मतदारर्सघात गुर्जर, मुस्लीम आणि मीणा समुदायाच्या मतदारांची संख्या अधिक आहे. काँग्रेस येथे गुर्जर अणि मुस्लीम समीकरणाद्वारे विजय मिळवित होता. पक्षाने यावेळी दानिश अबरार यांना उमेदवारी दिली होती. अबरार हे पूर्वी पायलट यांच्या गोटात होते, परंतु ते नंतर गेहलोत यांच्या गटात सामील झाले होते. गुर्जर समुदायाने दानिश यांना उघडपणे विरोध दर्शविला होता. दानिश यांनी पायलट यांना सभा घेण्याची विनंती केली होती. परंतु पायलट यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने दानिश हे पराभूत झाले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article