विमानाच्या लँडिंगनंतर पायलटचा मृत्यू
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीत एअर इंडिया एक्स्प्रेसच्या एका पायलटचा नुकताच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. श्रीनगर-दिल्ली विमान उतरल्यानंतर पायलट विमानतळावर इतर औपचारिकता पूर्ण करत असताना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. विमान कंपनीच्या म्हणण्यानुसार, लँडिंगनंतर पायलटला त्रास होऊ लागला आणि काही वेळाने तो बेशुद्ध पडला. पायलटला रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संबंधित वैमानिकाचे नाव अरमान असे असून तो 28 वर्षीय आहे. तो अलिकडेच विवाहबद्ध झाला होता. विमान उतरल्यानंतर कॉकपिटमध्ये पायलटला उलट्या झाल्या आणि त्यानंतर एअरलाईनच्या डिस्पॅच ऑफिसमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सहकारी क्रू मेंबर्सनी सांगितले. हृदयविकाराच्या झटक्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोस्टमॉर्टेम अहवाल आल्यानंतरच त्यासंबंधी अचूक माहिती उजेडात येणार आहे.