घुणकी फाटा ते वारणा नदी पूलापर्यंत पिलर पूल करा : आमदार डॉ. विनय कोरेंची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
वारणानगर / प्रतिनिधी
महामार्गापासून ८ किलोमीटर अंतरातील घुणकी, चावरे, जुने पारगांव, निलेवाडी गांवांना महापूराचा फटका बसत असल्याने सहापदरीकरण कामामध्ये घुणकी फाटा ते वारणा नदी पूलापर्यंत 'भराव' काढून या ठिकाणी पिलर पूलाची उभारणी करावी अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांच्याकडे आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली आहे.
घुणकी (ता. हातकणंगले) येथे सध्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ०४, पुणे-बंगळूर या महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. याच रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कामाचे वेळेस घुणकी फाटा ते वारणा नदी पूलापर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात भरावाचा वापर करणेत आला आहे. त्या भरावामुळे सन २०१९ व २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे घुणकी,चावरे,जुने पारगांव,निलेवाडी या महामार्गापासून किमान ८ किलोमीटर अंतरावरील गांवांना महापूराचा फटका बसून जन-जीवन विस्कळीत झाले. भविष्यात देखील या गावांतील जन-माणसांचे संसार व शेतजमिनींचे अतोनात नुकसान होणार आहे, त्यासाठी या महामार्गाचे सध्या सुरू असलेल्या सहापदरीकरण कामामध्ये संदर्भित भराव काढून या ठिकाणी पिलर पूलाची उभारणी करणे आवश्यक आहे असे आ. कोरे यांनी सुचवले आहे.
घुणकी, चावरे, जुने पारगांव, निलेवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील नागरीक व शेतकऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. ०४, पुणे-बेंगलोर या महामार्गाच्या सहापदरीकरण करणे कामामध्ये घुणकी फाटा ते वारणा नदी पूलापर्यंतच्या रस्त्याचा भरावा काढून सदर ठिकाणी पिलर पूलाचे बांधकाम करणे कामास मंजूरी द्यावी अशीही मागणी डॉ. कोरे यांनी केली आहे.