For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

45 कोटींच्या भूमिगत पाइपलाइनमुळे पिळगाव-नार्वे परिसरातील शेतीला बळ; 670 हेक्टर जमीन सिंचनाखाली; जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

03:03 PM Oct 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
45 कोटींच्या भूमिगत पाइपलाइनमुळे पिळगाव नार्वे परिसरातील शेतीला बळ  670 हेक्टर जमीन सिंचनाखाली  जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर
Advertisement

पिळगाव : जलस्रोत खात्यातर्फे पिळगाव ते नार्वे दरम्यान तिकारी कालव्याचे पाणी नेण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या भूमिगत पाइपलाइन प्रकल्पाचा शुभारंभ जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते पिळगाव येथे करण्यात आला. या प्रकल्पामुळे पिळगाव आणि परिसरातील शेतीला मोठा आधार मिळणार असून, सुमारे 670 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

Advertisement

गोव्यात गेल्या साडेचार वर्षांत जलस्रोत खात्याने केलेल्या कामांचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. यंदा राज्यात पाऊस कमी झाला असला तरी गोव्याला पाण्याची कमतरता भासणार नाही, असा विश्वास मंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केला. मात्र, नागरिकांनी पाण्याचा वापर करताना काळजी घ्यावी आणि पाण्याची बचत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रकल्पासाठी सुमारे 45 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, पिळगाव ते नार्वेपर्यंत 8 किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. हे काम सुमारे सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, त्याचा थेट लाभ जवळपास 1,000 शेतकऱ्यांना होणार आहे.

Advertisement

गोव्यातील जनतेला पिण्यासाठी तसेच शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. जलस्रोत खात्यामार्फत शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन विविध सिंचन प्रकल्प राबविले जात आहेत. शेतकऱ्यांनीही सरकारच्या प्रयत्नांना साथ देत आपल्या जमिनीचा पूर्ण वापर करून लागवड करावी. शेतीच्या माध्यमातून केवळ शेतकरीच नव्हे, तर सामान्य नागरिकही स्वयंपूर्ण होऊ शकतो, असे शिरोडकर यांनी सांगितले.

मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी या प्रकल्पाचे स्वागत केले. नार्वे येथे साकारण्यात आलेल्या जलवितरण योजनेमुळे मयेतील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा आधार मिळत आहे. आता पिळगाव ते नार्वे भूमिगत पाइपलाइनमुळे पिळगाव व परिसरातील शेतीला देखील मोठी चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

नार्वे परिसरात खुल्या कालव्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी कमी करण्याची मागणी यापूर्वी मंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्या मागणीचा सकारात्मक विचार करून भूमिगत पाइपलाइनचा प्रकल्प हाती घेण्यात आल्याने स्थानिकांची मोठी समस्या दूर होणार असल्याचे शेट यांनी नमूद केले.

मंत्री शिरोडकर यांच्या हस्ते भूमिपूजन तसेच कोनशिलेचे अनावरण करून कामाला औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य कुंदा मांद्रेकर, उपसरपंच उमाकांत परब गावकर, जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर, भाजप उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दयानंद कारबोटकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.