गुड्सशेड रोडवर कचऱ्याचे ढिगारे
बेळगाव : गुड्सशेड रोड येथे कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. हनुमान मंदिराच्या परिसरात आजुबाजूचा सर्व कचरा आणून टाकला जात असल्याने मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकात ये-जा करणाऱ्या नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा सामना करावा लागत आहे. हा कचरा केव्हा उचलला जाणार, असा प्रश्न विचारला जात आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या गुड्सशेड रोडवर कचरा टाकला जात आहे. रेल्वे स्थानकाच्या दक्षिण प्रवेशद्वाराला लागूनच हा कचरा आहे. आजूबाजूला रहिवासी वसाहती असतानाही कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. बऱ्याच वेळा स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून वेळेच्या वेळी स्वच्छता करूनदेखील आसपासचे नागरिक पुन्हा याच ठिकाणी कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी व अस्वच्छता वाढली आहे. रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच कचरा टाकला जात असल्याने प्रवाशांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे या ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही याची व्यवस्था महानगरपालिकेने करणे गरजेचे आहे. परिसरात हनुमान मंदिर तसेच अपार्टमेंट असल्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने येथील कचरा उचल करण्याची मागणी केली जात आहे.