‘वंदे मातरम्’चे तुकडे ‘लीग’च्या दबावात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर जोरदार प्रहार. लोकसभेत ‘राष्ट्रगाना’वर पार पडली वादळी चर्चा
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसचे तत्कालीन नेते जवाहरलाल नेहरु यांनी मुस्लीम लीगच्या दबावाखाली येऊन ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय महामंत्राचे तुकडे केले, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे. काही लोकांनी गेल्या शतकात स्वातंत्र्यसंग्रामाच्या या स्फूर्तीदायक मंत्राचा विश्वासघात केला. या गीतामुळे मुस्लीमांच्या भावना दुखावतील या भीतीपोटी या गीताची अवमानना करण्यात आली, अशीही टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत या राष्ट्रगानावर झालेल्या चर्चेत केली आहे.
‘वंदे मातरम’ या राष्ट्रगानाला या वर्षी 150 वर्षे पूर्ण होत आहेत. इसवी सन 1875 मध्ये हे गीत थोर देशभक्त आणि विख्यात बंगाली लेखक-कवी बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचले होते. नंतर त्यांनीच लिहिलेल्या ‘आनंद मठ’ या सुप्रसिद्ध कादंबरीतही ते समाविष्ट करण्यात आले होते. हे गीत भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा स्फूर्तीमंत्र होते. या गीताला 150 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संसदेत या गीतावर चर्चा आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी ही चर्चा लोकसभेत पार पडली. आज मंगळवारी ती राज्यसभेत होणार आहे. लोकसभेत या चर्चेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. सत्ताधारी आणि विरोधक अशा अनेक लोकसभा सदस्यांनी या चर्चेत भाग घेऊन या गीतासंबंधी त्यांची मते व्यक्त केली आहेत.
विरोधासमोर शरणागती
‘वंदे मातरम्’ या गीताचे भारताच्या जडणघडणीत अत्यंत महत्वाचे योगदान आहे हे संपूर्ण गीतच अत्यंत स्फूतीदायी आणि प्रेरणादाई आहे. तथापि, काँग्रेसच्या लांगूलचालन करण्याच्या वृत्तीमुळे या गीताचे तुकडे करण्यात आले. हे का करण्यात आले, याची माहिती पुढच्या पिढ्यांना देणे, हे आमचे कर्तव्य आहे. 1937 मध्ये मोहम्मद अली जीना यांनी या गीताच्या विरोधात मोठी आघाडी उघडली होती. तत्कालीन काँग्रेस आणि तिचे नेते जवाहरलाल नेहरु यांनी जीनांच्या या कृतीला विरोध करणे आवश्यक होते. तथापि, विरोध करण्याऐवजी त्यांनी शरणागती पत्करली. नेहरुंनी या गीताचे ‘संशोधन’ करण्यास प्रारंभ केला. या संबंधात त्यांनी सुभाष चंद्र बोस यांना एक पत्र पाठविले होते. ‘मी हे गीत संपूर्ण वाचले आहे. तसेच या गीताची पार्श्वभूमी समजून घेतली आहे. हे गीत मुस्लीमांना प्रक्षोभक वाटेल, असे माझे मत आहे. आम्ही या गीताचा उपयोग करायचा की नाही, यासंबंधी संशोधन करण्याचे ठरविले आहे,’ असे नेहरुंनी या पत्रात स्पष्ट केले आहे. त्यानंतर काँग्रेसने या गीताचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. या गीताची पहिली दोन कडवीच स्वीकारण्यात आली. ही कृती केवळ एका विशिष्ट समाजघटकाला खूष करण्यासाठी करण्यात आली होती, अशा अर्थाचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या साठ मिनिटांच्या भाषणात लोकसभेत केले.
100 व्या वर्षात आणीबाणी
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा मूलमंत्र ठरलेले हे गीत जेव्हा त्याची 50 वर्षे पूर्ण करत होते, तेव्हा भारतात ब्रिटीशांची सत्ता होती. ज्यावेळी या गीताला 100 वर्षे पूर्ण होत होती, तेव्हा काँग्रेसनेच देशात आणीबाणी लादून जनतेचे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते. आता या गीताच्या 150 व्य वर्षी आम्हाला त्याचा सन्मान, वैभव आणि प्रतिष्ठा पुनर्स्थापित करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या निमित्ताने देशाच्या देदिप्यमान भूतकाळाचेही स्मरण करण्याचा योग आला आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रगानाची भाषणात प्रशंसा केली.
अनेक खासदारांचा सहभाग
‘वंदे मातरम्’वरील ही चर्चा लोकसभेत 10 तासांहून अधिक काळ चालली. या काळात अनेक पक्षांच्या अनेक लोकप्रतिनिधींनी या चर्चेत भाग घेतला. सर्व वक्त्यांनी या गीताचे त्या काळातील, तसेच आजच्या काळातीलही महत्व विशद केले. या गीतामुळे स्वातंत्र्यसंग्रामाला धार चढली, असे बहुतेकांनी प्रतिपादन केले.
राजनाथसिंग यांच्याकडून समारोप
लोकसभेतील चर्चेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला, तर समारोप संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केला. त्यांनीही या गीताच्या थोरवीचे वर्णन करताना, स्वातंत्र्यसंग्रामातील काही प्रसंगांची उजळणी केली. आज भारतातील बहुतेक नागरीक स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेले आहेत. पण त्यांनाही ‘वंदे मातरम्’ आणि स्वातंत्र्यसंग्राम यांचे परस्परांशी असलेले अतूट नाते समजून घेतले पाहिजे. हे गीत आपल्या देशाच्या वैभवशाली इतिहासाचा एक महत्वाचा भाग आहे. आजच्या पिढीलाही राष्ट्रभक्तीची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य या गीतात आहे, असे प्रतिपादन राजनाथसिंग यांनी त्यांच्या ओजस्वी भाषणातून करुन या चर्चेची समाप्ती केली.
राहुल गांधी अनुपस्थित
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या वेळी उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी याही प्रथम अनुपस्थित होत्या. पण नंतर त्यांनी चर्चेत सहभाग घेतला. तथापि, काँग्रेसच्या वतीने वतीने खासदार गौरव गोगोई यांनी प्रमुख भाषण केले. राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 150 व्या वर्षानिमित्त या प्रेरणादायक गीताचा आणि त्यायोगे देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या स्वातंत्र्ययोद्ध्यांचा गौरव करीत असताना विरोधी पक्षनेते अनुपस्थित राहिल्याने त्यांनी या गीताला घोर अपमान केला आहे. या दोघांनाही या गीताचा थोडाही आदर करावासा वाटत नाही, असे टीकास्त्र भारतीय जनता पक्षाचे नेते सी. आर. केसवान यांनी सोडले.
हे गीत जोडणारे, तोडणारे नव्हे
वंदे मातरम् हे गीत देशाला जोडणारे आहे. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात या गीताने देशाला एकत्र आणण्याचे काम केले. तथापि, आता या गीताचा उपयोग ध्रूवीकरणासाठी केला जात आहे. भारतीय जनता पक्ष या गीताचा उपयोग समाजा-समाजांमध्ये फूट पाडण्यासाठी करीत आहे. या गीताची प्रशंसा करण्यामागे या पक्षाचा हाच हेतू आहे, असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केले. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने या गीतावर लोकसभेत भाषण केले.
‘दा’ की ‘बाबू’ यावर टिप्पणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘वंदे मातरम्’वर भाषण करीत असताना त्यांनी या गीताचे रचनाकार बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांचा उल्लेख ‘बंकीमदा’ असा केला. ‘दा‘ या अक्षराला तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी आक्षेत घेतला. बंकीमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगाली होते. बंगली भाषेत ‘दा’ या अक्षराचा अर्थ ‘दादा’ किंवा मोठा बंधू असा होतो. आपल्याला त्यांचा उल्लेख आदरार्थी करायचा असेल, तर ‘बंकीमदा’ असा उल्लेख न करता ‘बंकीमबाबू’ असा करावयास हवा. कारण ‘बाबू’ हा शब्द बंगाली भाषेत ‘आदरणीय’ या अर्थाने उपयोगिला जातो, अशी सूचना त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ही सूचना त्वरित मान्य केली. माझ्या भाषणात मी यांचा उल्लेख ‘बंकीमबाबू’ असा करेन, असे त्यानी त्वरित स्पष्ट केले.
आज राज्यसभेत चर्चा
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानावर आज मंगळवारी राज्यसभेत चर्चा होणार आहे. सत्तधारी बाजूच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या चर्चेचा प्रारंभ करणार आहेत. राज्यसभेतही ही चर्चा लोकसभेप्रमाणे किमान 8 ते 10 तास चालणार असून या चर्चेत सत्तधारी आणि विरोधी यांच्यातील शब्दद्वंद्व दिसून येणार आहे.
कोणी काय म्हटले...
ड पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक दृष्टीसमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने ही चर्चा आयोजित केली आहे. अन्यथा या चर्चेचे काहीही प्रयोजन नव्हते. आपल्या अपयशावरुन लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी सत्ताधारी हा खेळ करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पूर्वीसारखे कणखर नेते राहिलेले नाहीत.
-काँग्रेस खासदार प्रियांका गांधी
ड ही चर्चा सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या सहमतीनेच आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने ही चर्चा राजकीय लाभासाठी आयोजित केली आहे, असे म्हणणे हास्यास्पद आहे. काँग्रेसने या गीताची काटछाट करण्याचा उपद्व्याप केला. तो त्या पक्षाला आता भोवत आहे.
-भाजप खासदार दग्गुबती पुरंदेश्वरी
ड मुस्लीम लीग आणि जीना यांना या गीताची समस्या होती. म्हणून ‘जीनांच्या मुन्ना’नाही या गीताची समस्या निर्माण झाली. हे गीत पवित्र ग्रंथ कुराण आणि पवित्र ग्रंथ बायबल यांच्याइतकेच पवित्र आहे. हे गीत भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा प्रेरणास्त्रोत आहे. त्याला कोणाचाही विरोध असण्याचे खरे तर काही कारण नाही.
भाजप नेते अनुराग ठाकूर
ड काँग्रेसने या गीताचे तुकडे केले. विशिष्ट समाजघटकाचा अनुनय करण्यासाठी ही कृती करण्यात आली. असे करुन काँग्रेसने देशहिताचा घात केला आहे. प्रथम काँग्रेसने या गीताचे विभाजन केले. नंतर संपूर्ण देशातच विभाजन झाले. या विभाजनाची किंमत आजही काँग्रेसला भोगावी लागताना दिसून येत आहे.
-भाजप खासदार बसवराज बोम्माई
प्रथम तोडले गीत, नंतर देश
ड काँग्रेसने प्रथम हे गीत तोडले, नंतर स्वातंत्र्यावेळी देशाचेही झाले तुकडे
ड मुस्लीम लीगच्या दबावाखाली काँग्रेसकडून ‘वंदे मातरम्’ गीताचे विभाजन
ड या गीताची प्रतिष्ठा, सन्मान आणि वैभवाच्या पुनर्स्थापनेही आम्हाला संधी