Kolhapur Crime | गडमुडशिंगीत व्याजाच्या नावाखाली महिलेवर शारीरिक अत्याचार; खासगी सावकार अटकेत
कोल्हापुरात सावकाराचे क्रूर कृत्य
गडमुडशिंगी - व्याजाच्या वसुलीसाठी महिलेवर शारीरिक अत्याचार आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी खासगी सावकार अमित कृष्णात सावंत (वय ३५ वर्षे, रा. रोहिदास चौक, गडमुडशिंगी, ता. करवीर) याच्याविरोधात गांधीनगर पोलीसांत गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी संशयिताला गजाआड असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबतची माहिती अशी की, संबंधित पीडित महिला सामाजिक संस्थेत काम करत आहे. सन २०२३ साली आर्थिक अडचणींमुळे या महिलेने अमित सावंतकडून दोन लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. अमित सावंत हा कारवर चालक म्हणून काम करतो. सुरुवातीचे काही महिने नियमित व्याज दिल्यानंतर या महिलेची आर्थिक अडचण वाढत गेली. या महिलेच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेत तिच्याकडे अमित सावंत याने शरीरसुखाची मागणी केली. महिला एकटी घरी असताना जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर शरीरसंबंधाचे चित्रीकरण केले.
हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार त्याने पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला.दरम्यानच्या काळात पीडित महिलेने कर्जापोटी व्याजासह दोन लाख दहा हजार रुपये परत केले होते. परंतु उर्वरित पंचवीस हजार रुपयांसाठी खासगी सावकाराने पीडितेवर अत्याचार केले. त्यानंतर हे व्हिडिओ कारमालकाला पाठवले. या प्रकरणाचा जाबविचारण्यासाठी पीडित महिलेचा जावई गेला असता त्याला बेदम मारहाण केली. बदनामीच्या भीतीने शांत असलेल्या पीडितेने अखेरीस पोलीसांत धाव घेतली.
याबाबत गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास गांधीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करत आहेत.