महिला योद्ध्यांची छायाचित्रे प्रसिद्ध
पाकिस्तान सैनिकांवरील हल्ला : बीएलएचे कृत्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या बलुचिस्तानातील बंडखोर संघटनेने पाकिस्तान विरोधात मोठा संघर्ष छेडला आहे. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी या काळात या संघटनेने बलुचिस्तानात किमान 12 स्थानी पाकिस्तानी सैनिकांवर जोरदार हल्ले चढविले आहेत. या हल्ल्यामध्ये बलोच महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असून त्यांनी पाकिस्तानी सैनिकांच्या तुकड्यांवर आत्मघाती हल्ले करुन पाकिस्तानची मोठी हानी केली आहे. या संघटनेने सोमवारी अशा दोन आत्मघाती महिलांची नावे आणि छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यांची नावे हावा बलोच आणि असीफा मेंगाल अशी असल्याची माहिती बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने प्रसिद्ध केली आहे.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तानचे प्रशासन यांनी या हल्ल्यांमध्ये झालेल्या हानीसंबंधात परस्परविरोधी माहिती प्रसिद्ध केली आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानचे 200 हून अधिक सैनिक या 40 तासांच्या व्यापक हल्ल्यांमध्ये ठार झाले असून 17 सैनिकांना जिवंत धरण्यात आले आहे. या संघर्षात संघटनेचे 18 योद्धे मृत्युमुखी पडल्याचे तिचे म्हणणे आहे. याउलट पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार त्याच्या सैनिकांनी 145 बंडखोरांना ठार केले असून पाकिस्तानचे 17 सैनिक या कारवाईत ठार झाल्याचा त्याचा दावा आहे.
दुसरे ‘हारुफ अभियान’
बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे आहे. यासाठी ही संघटना गेली सहा दशके सशस्त्र संघर्ष करीत आहे. गेल्या काही वर्षांपासून बलोच महिलांनीही या संघर्षात मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्यास प्रारंभ केला असून त्या आत्मघाती योद्ध्या म्हणून बलुचिस्तान लिबरेशन आर्मीमध्ये प्रवेश घेत आहेत. पुरुष योद्ध्यांप्रमाणेच त्याही पाकिस्तानी सैनिकांवर हल्ले करीत आहेत आणि ते करत असताना आपले प्राण गमावत आहेत. पाकिस्तानी सैनिकांना घेऊन जात असलेल्या एका बसवर अशा महिलांनी आत्मघाती हल्ला केला असून अनेक सैनिकांना ठार केले.
गुप्तचर संस्था कार्यालयावर हल्ला
असीफा मेंगाल या आत्मघाती योद्धीने पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या बलुचिस्तानातील कार्यालयावर आत्मघाती हल्ला रविवारी केला होता, असे या संघटनेचे म्हणणे आहे. आमच्या संघटनेच्या महिला सदस्या पाकिस्तानच्या सैनिक तळांच्या अगदी जवळ जाऊन स्वत:च्या शरीरावर बसवलेला बाँब उडवून पाकिस्तानची हानी करत आहेत, असेही या संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या संघर्षाचे व्हिडीओ प्रसिद्ध
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने महिला कशा प्रकारे पाकिस्तानच्या सैनिकांशी संघर्ष करुन त्यांना संपवित आहेत, याचे व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत. या संघटनेने ‘हक्काल’ नामक एक वाहिनी स्थापन केली असून या वाहिनीच्या माध्यमातून हे व्हिडीओ जगभरात प्रसिद्ध केले जातात. ग्वादर येथे या संघटनेने केलेल्या हल्ल्यात हावा बलोच ही योद्धी सहभागी झाली होती. तिचा पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात मृत्यू झाला. हा व्हिडीओही प्रसिद्ध करण्यात आला आहे.