फोन पे आयपीओतून उभारणार 12 हजार कोटी
नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट क्षेत्रातील कंपनी फोन पे यांच्या आयपीओला बाजारातील नियामक सेबीने या आधीच मंजुरी दिली असून कंपनी आयपीओच्या माध्यमातून 12000 कोटी रुपये उभारणार असल्याची माहिती नव्याने देण्यात आली आहे. आयपीओ हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल अंतर्गत असणार आहे. कोणतेही नवे ताजे समभाग सादर केले जाणार नसल्याची माहिती देण्यात येत आहे. फोन पेमध्ये वॉलमार्ट यांची हिस्सेदारी आता कमी होणार आहे. फोन पे मध्ये अमेरिकेची रिटेल कंपनी वॉलमार्ट यांचा सर्वाधिक वाटा आहे. कंपनी जवळपास 9.06 टक्के हिस्सेदारी विक्री करणार आहे. म्हणजेच जवळपास 4.59 कोटी समभाग विक्री करणार आहे. फोन पे मध्ये वॉलमार्टची 71.77 टक्के इतकी हिस्सेदारी आहे. सदरचे आयपीओचे मूल्य ध्येय 1.37 लाख कोटी रुपयांचे ठेवण्यात आले आहे. पेटीएम या कंपनीनंतर फिनटेक क्षेत्रातली फोन पे ही दुसरी मोठी कंपनी आयपीओ सादर करणार आहे. यावर्षीच्या मध्यावर फोन पे चा आयपीओ सादर केला जाऊ शकतो अशी माहिती मिळते आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती
आयपीओसाठी कोटक महिंद्रा कॅपिटल, सिटी बँक, मॉर्गन स्टॅनले आणि जेपी मॉर्गन यासारख्या मोठ्या गुंतवणूक बँकांचा सल्ला घेतला जात आहे. वर्ष 2024-25 मध्ये फोन पे ने 41 टक्के वाढीसह 7 हजार 148 कोटीचा महसूल प्राप्त केला होता. कंपनीचा तोटा कमी होत 1720 कोटी रुपयांवर राहिला होता.