For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फोन पे मार्चपर्यंत आयपीओ आणण्याच्या तयारीत

07:00 AM Sep 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
फोन पे मार्चपर्यंत आयपीओ आणण्याच्या तयारीत
Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

फोन पे यांचा आयपीओ यंदा लाँच होणार होता. पण ही आयपीओ सादरीकरणाची योजना सध्या बारगळली आहे. जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर व गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा लक्षात घेऊन कंपनीने यावर्षी आयपीओ आणण्याचे टाळले आहे. तथापि आता कंपनीने म्हटले आहे की त्यांचा आयपीओ पुढील वर्षी मार्चपर्यंत सादर होऊ शकतो. कंपनीचे सहसंस्थापक व सीईओ समीर निगम यांनी ही माहिती शेअरबाजाराला दिली आहे. बेंगळूरच्या या कंपनीच्या आयपीओला 20 जानेवारी रोजी सेबीची मंजुरी मिळाली आहे. सीईओ निगम म्हणाले की यूपीआय व्यवहारांवर एमडीआर लागू करण्याच्या घोषणेनंतर वाढत्या महसुलाचा विचार करता या वर्षाच्या शेवटी कंपनी आपला आयपीओ बाजारात उतरवू शकते.

एमडीआरमुळे मिळणार बळ

Advertisement

ते म्हणाले, यूपीआयवर एमडीआरचा फायदा लक्षात घेता आम्हाला आयपीओ सादर करण्याच्या कार्याला अधिक बळ मिळाले आहे. एमडीआरविषयीची स्पष्टता झाल्यानंतर आयपीओ सादरीकरणाचा मार्ग स्पष्ट होणार आहे. नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी 15 सप्टेंबरला यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के एमडीआरची घोषणा केली. 2000 रुपये मूल्यापेक्षा अधिक व्यवहारावर हे शुल्क लागू असेल. सदरचे शुल्क 15 ऑक्टोबरपासून आकारण्यात येणार आहे. फोन पे यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच आयपीओची योजना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. जागतिक अनिश्चितता व गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा हे लक्षात घेत कंपनीने सदरील निर्णय घेतला. 20 जानेवारीला आयपीओला मंजुरी मिळाली असून आयपीओतून कंपनी 12 हजार कोटी रुपये उभारण्याची योजना बनवत आहे.

Advertisement
Tags :

.