आयपीओपूर्वी फोन पे बनली पब्लिक कंपनी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
वॉलमार्टची डिजिटल पेमेंट कंपनी फोन पे ने आयपीओ सादरीकरणापूर्वी आता प्रायव्हेट ऐवजी पब्लिक बनली आहे. 16 एप्रिल रोजी झालेल्या प्रवर्तकांच्या सर्वसाधारण बैठकीत फोन पे प्रायव्हेट लिमिटेड ऐवजी फोन पे लिमिटेड असे नामकरण करण्यास मंजुरी मिळाली आहे.
फोन पे शेअरबाजारात आयपीओ सादर करण्याच्या प्रक्रियेत गुंतली आहे. भारतीय शेअर बाजारात सुचीबद्ध होण्यापूर्वी असे करणे आवश्यक होते. फोन पे कंपनीने फेब्रुवारीत आयपीओ आणण्याची तयारी सुरु केली होती. कंपनी 1.28 लाख कोटी रुपयांच्या मूल्यासह आयपीओ आणण्याचा विचार करत आहे. याचदरम्यान आयपीओकरीता महिंद्रा कॅपिटल, जेपी मॉर्गन आणि मॉर्गन स्टॅनली यांना कंपनीने सल्लागार म्हणून नेमले आहे. डिसेंबर 2022 मध्ये कंपनीने आपले मुख्यालय सिंगापूरमधून भारतात स्थलांतरीत केले.
कंपनीची आर्थिक स्थिती
आर्थिक वर्ष 2024 मध्ये 5064 कोटी रुपयांचा महसुल कंपनीने प्राप्त केला होता. 2023 मध्ये कंपनी 738 कोटी रुपयांचा तोटा सहन करत होती. तर 2024 वर्षात कंपनीने 197 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.