फिलॅटलीमधून इतिहासासोबत सामान्यज्ञानात भर
डॉ. भीमाशंकर गुळेद : पोस्ट विभागाच्या फिलॅटली प्रदर्शनाचे उद्घाटन
बेळगाव : पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह (फिलॅटली) मधून केवळ इतिहासाचीच माहिती होते असे नाही तर सामान्यज्ञानातही भर पडते. या छंदामुळे अनेक विषयांची माहिती विद्यार्थ्यांना होत जाते. त्यामुळे अभ्यासाची एक गोडी निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांनी या फिलॅटली प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी केले. बेळगाव पोस्ट विभागाच्यावतीने महावीर भवन येथे आयोजित फिलॅटली प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर बेंगळूर येथील चिफ पोस्टमास्टर जनरल एस. राजेंद्रकुमार, धारवाड येथील पोस्टमास्टर जनरल कर्नल सुशीलकुमार, नॉर्थ विभागाच्या पोस्टल सर्व्हिस संचालक व्ही. तारा, बेळगावचे पोस्ट अधीक्षक विजय वडोणी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना एस. राजेंद्रकुमार म्हणाले, 100 वर्षांपूर्वी बेळगावमध्ये महात्मा गांधीजींच्या उपस्थितीत अधिवेशन झाले होते. त्याकाळी संपर्कासाठी पत्र हे एकमेव माध्यम होते. त्यामुळे या अधिवेशनामध्ये पोस्ट विभागाचा महत्त्वाचा वाटा असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. 10 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हिंदवाडी येथील महावीर भवन येथे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे यावेळी सांगण्यात आले. प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी हजारो विद्यार्थ्यांनी भेट दिली. या प्रदर्शनात देशातील विविध राज्यांची पोस्ट तिकिटे तसेच इतर देशांमधील तिकिटेही मांडण्यात आली आहेत. विविध विभागावर आधारित 180 रॅकमध्ये पोस्ट प्रदर्शन मांडण्यात आले आहे.