ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना ‘फाळके’ पुरस्कार
सुमारे 95 चित्रपटांमध्ये अभिनय , 22 वर्षांनी अभिनेत्रीचा फाळके पुरस्काराने होणार गौरव
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चित्रपटसृष्टीतील कलाकार तसेच तंत्रज्ञांना त्यांच्या सर्वोच्च कामगिरीसाठी देण्यात येणाऱया ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ विजेत्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे. यंदाचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे. 68 व्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळय़ात आशा पारेख यांना फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
22 वर्षांनी एखाद्या महिला कलाकाराला दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. स्वतःच्या दमदार अभिनयाच्या बळावर 1960 अन् 70 च्या दशकात बॉलिवूड गाजविणाऱया अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. आशा पारेख या सध्या 79 वर्षांच्या आहेत. 60-70 च्या दशकात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री अशीही त्यांची ओळख होती.
‘मेरा गाव मेरा देश’, ‘कटी पतंग’, ‘तीसरी मंजिल’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. एकेकाळी त्यांनी त्यांच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले होते. 1959 पासून 1973 पर्यंत त्यांनी बॉलिवूडवर स्वतःच्या अभिनय अन् सौंदर्याने राज्य केले होते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
ज्येष्ठ अभिनेत्रीचा अल्पपरिचय
आशा पारेख यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1942 रोजी झाला होता. 1959-73 या काळातील बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. बालपणासून नृत्याची आवड असणाऱया आशा पारेख यांचे नृत्य एका कार्यक्रमात दिग्दर्शक विमल रॉय यांनी पाहिले होते. त्यावेळी त्या केवळ 10 वर्षांच्या होत्या. 1952 मध्ये प्रदर्शित चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी ‘बाप बेटी’ यासह 95 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. राजेश खन्ना, मनोज कुमार, सुनील दत्त आणि धर्मेंद्र यासारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत त्यांनी मोठा पडदा गाजविला होता.
पद्मश्रीने गौरव
आशा पारेख अन् राजेश खन्ना यांची जोडी मोठय़ा पडद्यावर सुपरहिट म्हणून ओळखली जायची. त्यांनी एकत्र ‘दिल दे के देखो’, ‘जब प्यार किसी से होता है’, ‘तीसरी मंझील’ यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले होते. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कटी पतंग’ या चित्रपटासाठी आशा पारेख यांना सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तसेच 1992 मध्ये अभिनयातील योगदानासाठी भारत सरकारने पारेख यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते.