For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘पीएफ’चा 8.25 टक्के व्याजदर कायम

06:22 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘पीएफ’चा 8 25 टक्के व्याजदर कायम
Advertisement

वर्ष 2025-26 साठी व्याजदराची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील कोट्यावधी पगारदार कर्मचाऱ्यांना दिलासा देत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) 8.25 टक्के इतका व्याजदर कायम ठेवला आहे. ईपीएफओने सोमवारी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 8.25 टक्के निश्चित केला आहे. हा व्याजदर सलग दुसऱ्या वर्षीही कायम ठेवण्यात आला आहे. ईपीएफओ बोर्डाच्या या निर्णयाचा लाभ कोट्यावधी पीएफ खातेधारकाना होणार आहे.

Advertisement

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीटी) बैठकीत पीएफ व्याजदरांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय विश्वस्त मंडळ ही ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असून ती निधीचे व्यवस्थापन, गुंतवणूक आणि वितरण यावर नियंत्रण ठेवते. ‘सीबीटी’च्या निर्णयानंतर 2025-26 साठी ईपीएफ ठेवींवरील व्याजदर मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाईल. सरकारच्या मंजुरीनंतर, 2025-26 साठीचे व्याज 7 कोटींहून अधिक ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात जमा केले जाईल. अर्थ मंत्रालयामार्फत सरकारच्या मंजुरीनंतर ईपीएफओ व्याजदर प्रदान करते.

गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये, ईपीएफओने 2024-25 आर्थिक वर्षासाठी व्याजदर 8.25 टक्के राखला होता. तथापि, त्यापूर्वीच्या वर्षी म्हणजेच 2023-24 या आर्थिक वर्षासाठी व्याजदर किरकोळ वाढवून 8.25 टक्के करण्यात आला होता. 2022-23 या आर्थिक वर्षात 8.15 टक्के होता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2019-20 साठी भविष्य व्याजदर 2018-19 साठी निर्धारित केलेल्या 8.65 टक्क्यांवरून 8.50 टक्के या सात वर्षांतील सर्वात कमी पातळीवर आणला होता. तसेच 2013-14 आणि 2014-15 या दोन्ही आर्थिक वर्षात व्याजदर 8.75 टक्के होता.

Advertisement
Tags :

.