For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात पेट्रोल, डिझेल महागले

06:28 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यात पेट्रोल  डिझेल महागले
Advertisement

पेट्रोल 3 तर डिझेल दरात 3.50 रुपयांनी वाढ : जनतेच्या खिशावर आणखी ताण

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

लोकसभा निवडणूक संपताच कर्नाटक सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील किरकोळ विक्री करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही करवाढ त्वरित लागू केल्यामुळे राज्यात पेट्रोलचा दर 3 रुपयांनी तर डिझेलचा दर 3.50 रुपयांनी वाढला आहे. परिणामी वाहनधारकांसह सर्वसामान्य जनतेच्या खिशावर आणखी भार पडला आहे.

Advertisement

राज्यात प्रदीर्घ काळानंतर पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे. यापूर्वी पेट्रोलवर 25.92 टक्के विक्री कर होता. आता तो 3.9 टक्क्यांनी वाढविण्यात आल्याने 29.84 टक्क्यांवर पोहोचला आहे. डिझेलवर याआधी 14.34 टक्के विक्री कर होता. त्यात 4.1 टक्क्यांची वाढ झाली आहे, त्यामुळे हा कर 18.44 टक्क्यांवर पोहोचला आहे. परिणामी राज्यात पेट्रोलच्या दरात 3 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 3.50 रुपयांनी वाढ झाली आहे. शनिवारी राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात पेट्रोल आणि डिझेल दरवाढ तात्काळ लागू होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

राज्य सरकारने यापूर्वीच वीज दरवाढ, मद्यावरील कर वाढविला आहे. आता पेट्रोल-डिझेल दरात वाढ झाल्याने वाहनधारकांच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे. इंधनाचे दर वाढल्यानंतर त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या किमतीवर होत असतो. त्यामुळे आगामी काळात याचे प्रतिकूल परिणाम दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कर्नाटकात पेट्रोल, डिझेलचे दर किती?

बेंगळूरमध्ये सध्या एक लिटर पेट्रोलचा दर 99.84 ऊपये तर डिझेलचा दर 85.93 ऊपये प्रति लिटर आहे. आता कर वाढविल्यानंतर पेट्रोलचा दर प्रतिलिटर 102.84 ऊपये झाला आहे. त्याचप्रमाणे डिझेलचा दर 89.43 ऊपये प्रति लिटर झाला आहे. विविध जिल्हे आणि ग्रामीण भागात वाहतुकीच्या खर्चानुसार दरात बदल होत असल्याने दरात किरकोळ काहीसा बदल दिसून येऊ शकतो.

2021 मध्ये बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने पेट्रोलवरील विक्री कर 35 टक्क्यांवरून 25.9 टक्क्यांवर आणला होता, तर डिझेलवरील कर 24 टक्क्यांवरून 14.34 टक्क्यांवर आला होता.

लोकसभा निवडणूक घोषणेपूर्वी केंद्र सरकारने मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेल दरात 2 रुपयांनी वाढ केली होती. लोकसभा आणि विधान परिषद निवडणुका संपल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व खात्यांशी सल्लामसलत केली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांनी वाणिज्य कर खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी वाणिज्य कर संकलनाचे अपेक्षित उद्दिष्ट गाठणे अशक्य झाल्याने सिद्धरामय्यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवाय महसूल वाढविण्यासंबंधी अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केली. यावेळी पेट्रोल, डिझेलवरील किरकोळ विक्री करात वाढ करण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.

तिजोरीत 2,500 ते 3000 कोटी रु. उत्पन्नाची भर

राज्याची तिजोरी भरण्यासाठी सरकारला दुसरा मार्ग सापडलेला नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या करात वाढ करण्याची गरज लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या दरवाढीमुळे राज्याच्या तिजोरीचे उत्पन्न 2,500 ते 3000 कोटी रुपयांनी वाढेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

भाजपला मते दिल्याने सरकारकडून सूड

लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजपला मते दिल्याने राज्य काँग्रेस सरकारने पेट्रोल, डिझेल दरवाढ करून सूड उगवला आहे. हे सरकार लोकविरोधी आहे. अशास्त्राrय पद्धतीने जारी केलेल्या गॅरंटी योजनांमुळे राज्याची तिजोरी रिकामी झाली आहे. त्यामुळे सरकारने जनतेवर कराचा भार लादून खजिना भरण्यास निघाले आहे.

                     - आर. अशोक, विधानसभा विरोधी पक्षनेते

दरवाढीच्या निषेधार्थ भाजपचे उद्या आंदोलन

पेट्रोल-डिझेल दरवाढ होताच राज्य भाजपने उद्या (17 जून) राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केली आहे. दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आधीच राज्याची आर्थिक स्थिती कोलमडत आहे. जनतेने तुमच्याजवळ कोणतेही ‘भाग्य’ मागितलेले नाही. तुम्ही कोणतेही भाग्य दिले नाही तरी चालेल, मात्र दरवाढीचे दुर्भाग्य लादू नका, अशी प्रतिक्रिया विजयेंद्र यांनी ट्विटरवर केली आहे.

Advertisement
Tags :

.