पंजाबमध्ये पेट्रोल, डिझेल महागले
व्हॅट वाढीमुळे प्रतिलिटर 61 आणि 92 पैशांची वाढ : वाहनधारकांच्या खिशाला कात्री
वृत्तसंस्था/चंदीगड
पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. व्हॅट दरवाढीमुळे पेट्रोलच्या दरात 61 पैशांनी तर डिझेलच्या दरात 92 पैशांनी वाढ करण्यात आल्याचे अर्थमंत्री हरपाल चीमा यांनी सांगितले. याशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 किलोवॅटपर्यंतच्या 600 युनिटपर्यंतच्या वीज जोडण्यांवरील अनुदानही सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अर्थमंत्री हरपाल चीमा यांनी याबाबत माहिती दिली. सरकार लोकांना इतर अनेक सुविधा देत असताना राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंजाब मंत्रिमंडळाने तीनचाकी व्यावसायिक वाहनांवर (ऑटो) त्रैमासिक कराचा नियम रद्द केला आहे. आता तीनचाकी व्यावसायिक वाहनांवर वार्षिक कर भरावा लागणार आहे. या निर्णयामुळे दर 3 महिन्यांनी कर भरण्यापासून सूट मिळणार असल्याने वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. तसेच एखाद्या व्यक्तीने नवीन वाहन खरेदीवर 4 वर्षांचा एकत्रित कर भरला तर त्याला 10 टक्के सवलत दिली जाईल. 8 वर्षांसाठी कर जमा केल्यावर ही सूट 20 टक्के असेल, अशी माहितीही अर्थमंत्र्यांनी दिली.