पेट्रो डॉलर्सचा डाव संपला अर्धशतकी दोस्ती ताणली
जागतिक राजकारणातील घडामोडींनी देशोदेशींच्या विदेश आणि कुटनितीवर बराच ताण आलेला आहे. विविध देशांत युद्धाची ठिणगी पडलेली असतानाच आता अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यातील मतभेद शिगेला पोहोचले असून 70-80 वर्षांच्या दोस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. सौदी अरेबियाने 9 जून 2024 रोजी संपुष्टात आलेला पेट्रोडॉलर्सचा करार मोडीत काढला. तर प्रतिडाव म्हणून अमेरिकेने सप्टेंबर 2001 मधील हल्ल्यात सहभागी सौदीच्या गुप्तहेराचा व्हिडिओ जारी केला.
सौदी अरेबियाचे युवराज महंमद बिन सलमान यांनी सौदी अरेबियाची सत्तासूत्रे हाती घेत देशाच्या धोरणात अमुलाग्र बदल घडवून आणलेला आहे. देशांतर्गत कायद्यात बदल घडवून आणतानाच विदेश नितीला नवे आयाम देण्याचे काम युवराजांनी केलेले आहे. आपल्या पारंपारिक दोस्तीच्या पलीकडे जात अमेरिकेला नापसंत असलेल्या देशांबरोबर संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरु केलेले आहेत. सौदी अरेबियाच्या या धोरणाने अमेरिकाही संभ्रमात पडलेली पाहायला मिळते आहे.
1970 च्या दशकात अमेरिकेतील औद्योगिकीकरण शिगेला पोहोचलेले होते. त्यावेळी आखाती व अन्य तेल उत्पादक देशांनी अमेरिकेची कोंडी केली होती. त्यावर तोडगा म्हणून अमेरिकेने सौदी अरेबियाला हाताशी धरून आपली चांदी करून घेण्याच्या इराद्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष किशिंजर यांनी एक वेगळीच चाल रचली. त्यावेळी 1948 साली स्थापन झालेल्या इस्त्रायलने तीनवेळा लादलेल्या युद्धात आखाती देशांचे कंबरडे तोडून आपला धाक निर्माण केला होता. त्यावर तोडगा म्हणून अमेरिकेने सौदी अरेबियाला आर्थिक सबलीकरण आणि सैन्य सुरक्षेचे आश्वासन दिले होते. अर्थातच त्याच संधीचा फायदा घेत अमेरिकेने पेट्रो डॉलर्सचा करार आपल्या पदरात पाडून घेतला.
पेट्रोडॉलर्सच्या करारानुसार सौदी अरेबिया आणि अन्य अरब मित्र देश पेट्रोलियम पदार्थांचा व्यवहार केवळ डॉलर्सच्या माध्यमातून करण्यासाठी राजी झाले होते. या पेट्रोडॉलर करारामुळे अमेरिकेच्या डॉलर्सला भरपूर मागणी आली. सौदी अरेबियाबरोबर 1973 साली झालेल्या करारामुळे अमेरिकेच्या डॉलर्सचा डंका जगभरात वाजू लागला. त्या बदल्यात सौदी अरेबियाची सुरक्षा अमेरिकेची जबाबदारी बनली होती. पेट्रोडॉलर्स अस्तित्वात आल्यापासून सोन्याचा चलन म्हणून होत असलेला वापर बंद झाला. त्यामुळे अमेरिकेच्या डॉलर्सची मक्तेदारी वाढतच गेली. कच्च्या तेलाची आयात करणाऱ्या बहुतांश देशांना अन्य कोणताही पर्याय राहिला नाही.
अमेरिकेबरोबर पेट्रोडॉलर्सचा करार केल्यानंतर सौदी अरेबिया व अन्य आखाती देश गर्भ श्रीमंतांच्या यादीत पोहोचले. सौदी अरेबियापाशी संपत्ती आणि मक्का मदिनाच्या माध्यमातून इस्लामची शक्ती प्राप्त झाली. इस्लामिक देशांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पण 1970 दशकात पेट्रोलियम पदार्थांसाठी लाचार बनलेला अमेरिका आपल्याच देशात इंधनाच्या खाणी शोधत होता. त्यांना हवा असलेला साठा दगड धोंड्यात सापडला. 1990 च्या आसपास अमेरिकेला तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादनाचा स्त्रोत सापडला.
आपल्या संशोधनाच्या बळावर कच्च्या तेलाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. 2004 सालापासून अमेरिकेने शेल कच्च्या तेलाचे उत्पादन पूर्ण क्षमतेने घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे आखाती देशांवर असलेली निर्भरता कालांतराने कमी कमी होत गेली. आजच्या घडीला अमेरिका हा नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाचा प्रमुख निर्यातदार बनलेला आहे.
अमेरिकेत देशी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढत असतानाच 2001 साली अमेरिकेवर झालेला दहशतवादी हल्ला धक्कादायक होता. त्याच्या मुळाशी चौकशी केली असता त्यांना 1999 पासून सौदी अरेबियाच्या गुप्तचराने अमेरिकेतील महत्त्वाच्या जागांची रेकी केल्याचे पुरावे सापडले. या क्षणापासून अमेरिकेने सौदी अरेबियाला धडा शिकवण्याचा विडा उचलला. वर्ल्ड ट्रेड सेंटर व पेन्टागॉनवर सप्टेंबर 2001 साली हल्ला झाल्याच्या घटनेला एक दशक पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेच्या हाती भक्कम पुरावे सापडले. त्यानंतर अमेरिकन काँग्रेसच्या संसदीय समितीने सौदी अरेबियावर दहशतवादाशी हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवणारा अहवाल सादर केला. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा विरोध डावलून स्वपक्षीय डेमोक्रॅटनी 2016 साली अमेरिकन संसदेच्या पटलावर ठेवला. अमेरिकेच्या या कृतीवर सौदी अरेबिया पूर्ण नाराज आहे. या घटनेनंतर तुर्कस्तानमधील सौदी अरेबियाच्या राजदूतावासात अमेरिकेतील वॉल स्ट्रीटचे स्तंभलेखक खाशोगी यांची हत्या अमेरिकन प्रसार माध्यमे आणि प्रशासनाने ताणून धरल्याने दुसऱ्या महायुद्धापासून असलेले मित्रत्वाचे नाते संपुष्टात आले होते.
अतिमहत्त्वाकांक्षी सौदी अरेबियाचे युवराज महंमद बिन सलमान यांनी अमेरिकेचा हा बदललेला चेहरा ओळखून आपली विदेश रणनिती वेगळ्या मार्गाने नेण्यास सुरुवात केली आहे. कधी नव्हे ते सौदी अरेबियाचे युवराज, मंत्रिमंडळ सदस्य रशिया आणि चीनच्या भेटीवर जाऊ लागले. रशियाच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय ब्रिक्स देशांच्या संघटनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न चालविले असून चीन सरकारने त्यासाठी आपली शक्ती लावलेली आहे.
सौदी युवराजाला वेसण घालण्यासाठीच आता अमेरिकेने एक व्हिडिओ जारी करून आरपारची लढाई सुरु केलेली आहे. अमेरिका आता कच्च्या तेलाचा निर्यातदार बनला असून सौदी अरेबियाची गरज एव्हाना संपुष्टात आलेली आहे. त्यासाठीच सप्टेंबर 2001 मधील अमेरिकेवरील दहशतवादी हल्ला हा सौदी पुरस्कृत असल्याचा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. अर्ध शतकी दोस्तीला आता ओरखडे ओढले असून उभयतांकडून डाव प्रतिडावाचा खेळ सुरुच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
प्रशांत कामत