विमानचालकाच्या पित्याकडून याचिका
अहमदाबाद दुर्घटनेच्या स्वतंत्र चौकशीसाठी मागणी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अहमदाबाद येथे 12 जूनला झालेल्या भीषण विमान दुर्घटना प्रकरणी स्वतंत्र प्राधिकरणाकडून चौकशी केली जावी, या मागणीसाठी या दुर्घटनेत मृत्यू पावलेले विमान चालक कॅप्टन सुमित सबरवाल यांचे पिता पुष्कर राज सबरवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत केली जावी, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. या दुर्घटनेची चौकशी केंद्र सरकारच्या वतीने केली जात आहे. तथापि, आपला या चौकशीवर विश्वास नाही, असे पुष्करराज सबरवाल यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारच्या चौकशी प्राधिकरणाने या प्रकरणात प्राथमिक अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालातील निष्कर्षांवर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. हा अहवाल अपूर्ण आणि पूर्वग्रहदूषित आहे. या अहवालात विमान चालकावर अन्याय करण्यात आला आहे. याचा विपरीत परिणाम अन्य विमानचालकांवर होऊ शकतो. त्यामुळे हा अहवाल रद्द करण्याचा आदेश देऊन या प्रकरणाची एका स्वतंत्र समितीच्या माध्यमातून स्वतंत्र चौकशी केल्यास दुर्घटनेचे खरे कारण स्पष्ट होईल. सध्याच्या अहवालात दुर्घटनेचे कारणच स्पष्ट करण्यात आलेले नाही. असा अहवाल विमानचालकावर अन्याय करणारा आहे, असे प्रतिपादन या याचिकेत आहे.
अहवालात केणते कारण...
प्रवासी विमानाने विमानळावरुन आकाशात उ•ाण केल्यानंतर त्वरित विमानाच्या इंजिनांचा इंधन पुरवठा करणारे स्वीच बंद झाले. दोन्ही स्वीच एक सेकंदाच्या अंतराने बंद झाले. त्यामुळे इंधनाअभावी विमान कोसळले. हे या दुर्घटनेचे मुख्य कारण आहे, असे एएआयबीकडून झालेल्या चौकशीच्या प्रारंभिक अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. हा अहवाल तज्ञांच्या टीकेचे लक्ष्य बनला होता. चालक सबरवाल यांनीच इंजिनांचा इंधन पुरवठा थांबवला असा आरोप करण्यात आला होता. विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये चालकांचा संवाद ध्वनिमुद्रीत झाला आहे. त्यानुसार एक चालक पुरवठा का बंद केला असा प्रश्न अन्य चालकाला विचारीत आहे. मी पुरवठा बंद केला नाही, असे दुसरा चालक उत्तर देत आहे. ही बाब अहवालात नमूद करण्यात आली आहे. तथापि, अपघाताचे नेमके करण स्पष्ट करण्यात आलेले नाही. हा अहवाल भ्रम निर्माण करणारा आहे, असे सबरवाल यांच्या पित्याचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर केव्हा आणि कोणता निर्णय देणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ही दुर्घटना अलिकडच्या काळातील सर्वात भीषण दुर्घटना आहे, असे मानले जात आहे.