एमबीबीएस गुणांच्या पुनर्मूल्यांकनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल
सर्व प्रतिवाद्यांना नोटिसा जारी, 10 नोव्हेंबरला सुनावणी
पणजी : बांबोळी येथील गोमेकॉमध्ये एमबीबीएसच्या अंतिम वर्षासाठी मिळालेल्या गुणांचे पुनर्मूल्यांकन करण्याची संधी नाकारल्याबद्दल लारिसा आल्वारीस आणि अन्य तीन विद्यार्थांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. याप्रकरणी बुधवारी सुनावणी घेऊन सर्व प्रतिवाद्यांना नोटिसा पाठवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. याचिकादार लारिसा आल्वारीस आणि अन्य तीन विद्यार्थ्यांनी एमबीबीएसच्या अंतिम वर्षासाठी एप्रिल-मे 2025मध्ये परीक्षा दिली होती. एकूण 43 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत भाग घेतला असता, त्यातील 23 जण उत्तीर्ण झाले आणि 18 विद्यार्थी नापास झाले. सर्व याचिकादारांचा नापास विद्यार्थ्यांमध्ये समावेश होता.
नापास झालेल्या आठ विद्यार्थ्यांनी आपल्या पेपरचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी अर्ज करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना नव्या अधिसूचनेनुसार पेपरच्या गुणांचे फक्त पुनर्पडताळणी करण्याची मूभा असल्याचे सांगण्यात आल्याने त्यांच्यासमोर असलेला एकच पर्याय त्यांनी स्वीकारला. मात्र, पुनर्पडताळणीच्या निकालात कुणाच्याही गुणांमध्ये बदल झाला नसल्याचे कळवण्यात आले. यामुळे अन्याय झाल्याच्या भावनेने याचिकादारासह काही विद्यार्थ्यांनी भारताच्या पंतप्रधानाच्या कार्यालयात आणि गोवा विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाकडे लेखी तक्रार केली. तसेच अंतिम वर्षाच्या निकालाची ऑनलाईन आणि प्रत्यक्षात हाती दिलेल्या प्रतमध्ये मोठा फेरफार झाल्याचे त्यांनी सांगितले. नापास म्हणून जाहीर करण्यात आलेले तीन विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे दाखवण्यात आल्याने नव्याने पुनर्मूल्यांकन करण्यायाप्रकरणी काल बुधवारी प्राथमिक सुनावणीवेळी अॅड. कृपा विश्वधर नाईक यांनी याचिकादारांचे प्रतिनिधित्व केले. सुनावणी घेऊन सर्व प्रतिवाद्यांना नोटिसा पाठवण्याचा आदेश देऊन पुढील सुनावणी 10 नोव्हेंबर रोजी ठेवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.