‘छावा’च्या निर्मात्याविरोधात याचिका दाखल
सातारा :
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या छावा या चित्रपटात राजेशिर्के घराण्याचा चुकीचा इतिहास दाखवून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांनी बदनामी केलेली आहे. शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवरुन हा चित्रपट साकारत असताना निर्माता, दिग्दर्शक, लेखकांनी गणोजी आणि कानोजी यांच्याबाबत काहीतरी पुरावे शोधणे गरजेचे होते. कोणताही वस्तुस्थितीजन्य पुरावा नसताना त्यांनीच छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिले असे दाखवण्यात आले आहे, ही चुकीची बाब असून त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक यांच्या विरोधात सातारा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती इतिहास संशोधन मंडळाचे सचिन राजेशिर्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजेंद्र शेलार, निलेश झोरे, विक्रमादित्य साळुंखे, महेश देशपांडे आणि अरबाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सचिन राजेशिर्के म्हणाले, छावा या चित्रपटात राजेशिर्के घराण्याचा अतिशय चुकीचा इतिहास दाखवण्यात आलेला आहे. छत्रपती घराण्याचे आणि आमच्या राजेशिर्के घराण्यांचे पै पाहुण्याचे संबंध आहेत. असे असताना छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी राजेशिर्के मदत करत असे दाखवले गेले ते विनाआधार, विना पुराव्याशिवाय चुकीचे आहे. संभाजी महाराजांना पकडून देण्याविषयी त्याकाळचा एक पुरावा आढळतो तो म्हणजे पाँडेचरीचा फ्रेंच गव्हर्नर फ्रॉन्सिस मार्टिन याची रोजनिशी. त्याच्या रोजनिशीत मार्च 1669 मध्ये एक नोंद आहे. त्यात तो म्हणतो संभाजी राजास मोगल फौजांनी पकडून घेतले. राजाच्या कित्येक ब्राम्हण सल्लागारांनी राजाशी बेईमान होवून मोगलास त्याच्या मुक्कामाची वर्दी दिली. मोगल लष्कराच्या सेना नायकांशी त्या ब्राम्हण कारभाऱ्यांनी अगोदरच सूत जमवले होते. यावरुन आपणास हे लक्षात येते की याचे मूळ सुत्रधार गणोजी शिर्के नव्हते. जर राजेशिर्के फितूर असते तर संभाजी महाराजांचे पुत्र जेव्हा सातारमध्ये आले तेव्हा त्यांनी जी दोन लग्ने केली त्यातल्या थोरल्या राणी या आमच्या राजेशिर्के घराण्यातील होत्या. तसेच छत्रपती शाहु महाराजांनी त्यांच्या तख्ताच्या वाड्याच्या शेजारी राजेशिर्केंना मोठा वाडा बांधून दिला होता.
महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयांनी पैठणचे श्री. रामकृष्ण मच्छिंद्र शिर्के यांना दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांना पकडून दिल्याचा ऐतिहासिक संदर्भ अथवा पुरावे या कार्यालयात उपलब्ध नाहीत. यावरुन लक्षात येते की, गणोजी शिर्के हे फितूर नव्हते. त्यामुळे छावा चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक यांनी राजेशिर्के घराण्याची जाहीरपणे माफी मागून जाहीर करावे की छावा चित्रपट हा ऐतिहासिक पुराव्यावर आधारित नाही असे. तसेच छावा चित्रपटाच्या निर्माते, दिग्दर्शक यांच्या विरोधात सातारा न्यायालयात दावा दाखल केलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.
- निलेश झोरे यांनी सांगितली राजेशिर्के घराण्याची सोयरिक
निलेश झोरे यांनी छत्रपती घराणे आणि राजेशिर्के घराणे यांची सोयरिक सांगितली. ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहु महाराज. छत्रपती शाहु महाराज यांची पत्नी सकवारबाई या कुंवर राजेशिर्के यांच्या भगिनी होत्या. छत्रपती शाहु महाराज दुसरे यांच्या चौथ्या पत्नी आनंदीबाई या भवानजी राजेशिर्के यांच्या कन्या होत्या. तसेच आनंदीबाई यांचे बंधू यशवंतराव हे श्री. छ. प्रतापसिंह महाराजांची बाजू मांडण्यासाठी लंडनला गेले होते. तसेच छ. शहाजी उर्फ अप्पासाहेब महाराज यांना चार पत्नी होत्या. त्यापैकी 3 या राजेशिर्के घराण्यातल्या होत्या. असे नातेसंबंध असताना राजेशिर्के घराणे कशी फितुरी करु शकतील, चुकीचा इतिहास चित्रपटात दाखवला गेला आहे, असे झोरे म्हणाले.