For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका; उद्या सुनावणी होणार

04:00 PM Sep 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका  उद्या सुनावणी होणार
Advertisement

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाबाबत नवा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. आंदोलनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका एमी फाऊंडेशनकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. महेंद्र रत्ना यांनी दिली.

Advertisement

मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, यापूर्वीच्या आंदोलनाचा संदर्भ देत पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी प्रस्तावित आंदोलनाबाबत अधिक सविस्तर माहिती मागवली आहे. मुंबईत आंदोलनासाठी येणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवक तसेच आंदोलनाच्या व्यवस्थापनाशी संबंधित इतर तपशील पोलिसांनी मागितल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

आंदोलनाला परवानगी देऊ नये, याचिकेत मागणी

एमी फाऊंडेशनने दाखल केलेल्या याचिकेत आझाद मैदानावरील प्रस्तावित आंदोलनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशा परिस्थितीत आंदोलनामुळे सार्वजनिक रस्ते आणि जागांवर वाहतुकीसह नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर परिणाम होण्याची शक्यता याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.

सार्वजनिक सभा, आंदोलने आणि मिरवणुकांसंदर्भातील नियमांचा उल्लेख करताना आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी सार्वजनिक मार्ग किंवा जागा अनिश्चित काळासाठी अडवून ठेवता येणार नाही, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.

जरांगे पाटील काय निर्णय घेणार?

या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष लागले आहे. न्यायालयातील याचिकेवर होणाऱ्या सुनावणीनंतर जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाबाबत पुढील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबईला जायचे की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय मनोज जरांगे पाटील घेतील, असे गंगाधर काळकुटे यांनी सांगितले. मुंबई पोलिसांकडून आलेल्या पत्राला वकिलांमार्फत उत्तर दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.