ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका; महाराष्ट्रातील एसआयआर थांबवण्याची मागणी
कोल्हापूर : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. रत्नागिरीचे प्रथमेश गोपाळ गवाणकर, गौरव सूर्यकांत नाखरेकर, आदेश शशिकांत भाटकर आणि स्मिताली निलेश नार्वेकर यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.
याचिकेत केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी तसेच राज्य निवडणूक आयोगाला प्रतिवादी करण्यात आले आहे. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी गेल्या दहा महिन्यांत विविध निर्णय व प्रक्रियांवर १४ वेळा आक्षेप नोंदवल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाच्या निर्णयप्रक्रियेतील कथित अनियमितता आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन झाले का, याची न्यायालयीन तपासणी करण्याची मागणी याचिकेत केली आहे.
१४ निर्णयांवर आक्षेपाचा दावा
एसआयआर, नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतून नावे वगळणे आणि पुन्हा समाविष्ट करणे, मतदार याद्यांची सुरक्षा तसेच ईसीआयनेट प्रणालीशी संबंधित बाबींवर दोन निवडणूक आयुक्तांनी आक्षेप घेतल्याचे याचिकेत नमूद केले आहे. या आक्षेपांचा योग्य विचार न करता काही निर्णय घेतल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा, २०२३ मथील तरतुदीनुसार निर्णयप्रक्रिया सामूहिक पद्धतीने होणे अपेक्षित असताना त्याचे पालन झाले का, असा प्रश्नही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.
एसआयआर थांबविण्याची मागणी महाराष्ट्रातील सुरू असलेली विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया (एसआयआर) थांबविण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. तर मतदार यादीतून वगळलेली नावे पडताळणी करून पुन्हा समाविष्ट करावीत, तसेच मतदार यादीतील कथित अनियमिततेची स्वतंत्र चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.