कोरोना लसीच्या दुष्परिणामांचा आरोप करणारी याचिका फेटाळली
‘फक्त सनसनाटी!’साठी याचिका दाखल केल्याचे सुप्रीम कोर्टाचे मत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना लसीमुळे रक्त गोठल्यासारखे दुष्परिणाम झाल्याचा आरोप करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने यासंबंधी महत्त्वाचे मत नोंदवताना ‘ही जनहित याचिका केवळ खळबळ उडवण्यासाठी दाखल करण्यात आली होती’ असे म्हटले आहे. तुम्ही लस न घेतल्यास कोणते दुष्परिणाम झाले असते हेदेखील समजून घ्या, असा सल्लाही याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने दिला. प्रिया मिश्रा आणि इतर याचिकाकर्त्यांनी ही याचिका दाखल केली होती.
कोरोना लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या आणि प्लेटलेट्स कमी होणे यासारखे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात, असे अॅस्ट्राझेनेकाने ब्रिटनच्या न्यायालयात कबूल केल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली. भारतात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशील्ड ही लस तयार केली होती. या लसीचे देशात 175 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. भारतात 2020 च्या प्रारंभी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर हा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन सारखे पर्याय निवडण्यात आले. मात्र, जास्त कालावधीसाठी हा पर्याय योग्य नसल्याने कारोना संसर्ग प्रतिबंधक लसीचे संशोधन करून त्याचे डोस देशातील सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आले. या डोसमुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यात हातभार लागला होता. भारताने दोन लसींच्या माध्यमातून ही मोहीम यशस्वी करतानाच इतर अनेक देशांनाही कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला होता. भारताच्या या मोहिमेचे जागतिक पातळीवर कौतुकही झाले होते.