‘कावड’ क्युआरकोड विरोधात याचिका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तर प्रदेशात प्रतिवर्षाच्या प्रथेप्रमाणे 11 जुलैपासून ‘कावड यात्रे’चा प्रारंभ करण्यात आला आहे. या यात्रेत लक्षावधी भाविक भाग घेतात. या यात्रेकरुंच्या सोयीसाठी खासगी खाद्यपेयगृहे यात्रामार्गावर स्थापन केली जातात. अशा प्रत्येक खाद्यपेयगृहाने आपल्याला मिळालेल्या अनुपत्राचा क्यूआरकोड खाद्यपेय गृहावर ठळकपणे दिसेल अशा प्रकारे प्रदर्शित केला पाहिजे, असा नियम उत्तर प्रदेश सरकारने केला आहे. मात्र, या नियमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून तशा प्रकारची याचिका सादर करण्यात आली आहे.
या प्रशासकीय आदेशामुळे सर्वोच्च न्यायालयाने 2024 मध्ये दिलेल्या एका निर्णयाचा भंग होत आहे, असे प्रतिपादन या याचिकेत करण्यात आले आहे. खाद्यपेयगृहाच्या मालकांवर किंवा चालकांवर त्यांची व्यक्तीगत माहिती, अगर नाव घोषित करण्याची सक्ती करु नका, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी दिला होता. या आदेशाचा भंग होत आहे, असे याचिकेत प्रतिपादन करण्यात आले आहे. ही याचिका अपूर्वानंद झा यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.