महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

माटवे येथे विहिरीचे पाणी घेतेय पेट!

10:43 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वास्को, दाबोळीसह मुरगावात खळबळ : वाहिनीतील इंधन झिरपल्याचा संशय,लोकांमध्ये भीती, धाकतळेची पुनरावृत्ती

Advertisement

वास्को : वास्कोतील माटवे दाबोळी भागातील विहिरींमध्ये पेट्रोलजन्य पदार्थ आढळून आला असून या विहिरींमधील पाणी पेट घेत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. दहा वर्षांपूर्वी घडलेल्या धाकतळे येथील आगीच्या भडक्यानंतर दाबोळीतील या नव्या घटनेमुळे वास्कोत पुन्हा खळबळ माजली आहे. डोंगरमाथ्यावरील इंधन वाहिनीला गळती लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून लोकांमध्ये रोष पसरल्याचे दिसत आहे. माटवे दाबोळीतील स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेले काही दिवस गावातील विहिरींमधील पाण्याला वास येत होता. हा वास हळुहळु उग्र बनत गेला. रविवारी संध्याकाळी या प्रकाराची चर्चा वाढली होती. काही लोकांनी विहिरीच्या पाण्याचा वापरही बंद केला. काहींनी स्थानिक पंच निलम नाईक यांना तसेच काही समाजसेवकांनाही माहिती दिली. त्यामुळे रविवारी हा विषय वाढला. काहींनी विहिरीचे पाणी काढून ते पेटवण्याचा प्रयत्न केला असता भडकाच उडाला आणि लोकांमध्ये खळबळ उडाली. माटवे भागात सहा विहिरी आहेत.
Advertisement

धोका असलेली विहीर सील

या घटनेची माहिती अग्निशामक दल, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, जैवविविधता मंडळ, स्थानिक पंचायत, उप जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य खाते इत्यादींना देण्यात आलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन मंडळाने या घटनेची दखल घ्यावी व सुरक्षेची उपाययोजना आखावी अशी मागणी स्थानिक लोकांनी केली आहे. अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पाण्याचे नमुने घेतले आहेत. पाणी पेटत असल्याचा अनुभव त्यांनी घेतला. विहिरींच्या जवळपासच्या लोकांना आग पेटवण्यास मनाई करण्यात आलेली आहे. धोका असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन अग्निशामक दलाने केले आहे. धोकादायक असलेली एक विहीर दलाने सीलबंद केली आहे.

शासकीय अधिकारी घटनास्थळी तेल कंपन्यांकडूनही पाहणी

काल सोमवारी संध्याकाळी माटवे भागात उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. भारतीय तेल महामंडळ तसेच झुआरी इंडियन ऑईल टँकिंग लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. विहिरींबरोबरच या गावातील कूपनलिकाही (बोरवेल्स) प्रदूषित झालेल्या आहेत.  स्थानिक ओहोळातूनही पेट्रोलजन्य पदार्थ वाहत असल्याचा संशय आहे.

वाहिनीला गळती लागल्याचा संशय

अग्निशामक दल व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार माटवे गावाच्या डोंगरमाथ्यावर महामार्गाच्या बाजूला भूमिगत इंधन वाहिनी आहे. ही इंधन वाहिनी मुरगाव बंदरातून थेट झुआरीनगरातील झुआरी इंडियन ऑईल टँकिंग लिमिटेडच्या तेल टाक्यांना जोडण्यात आलेली आहे. या वाहिनीला माटवे डोंगरमाथ्यावर कुठे तरी गळती लागली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच सखल भागातील दाबोळी गावातील जमिनीत इंधन वेगाने पसरत चाललेले आहे. त्यामुळे लोकांमध्ये चिंता पसरलेली आहे. झुआरीच्या इंधन वाहिनीतून इंधन वाहणे सध्या बंद ठेवण्यात आलेले आहे. सोमवारी रात्री तेल कंपन्यांकडून त्या विहिरीतील पाणी टँकरमध्ये खेचण्याचे काम करण्यात येत होते. अग्निशामक दल या ठिकाणी तैनात आहे.

धाकतळे येथे वीस वर्षांपूर्वी पेटली होती विहीर

यापूर्वी 2001 साली वास्कोतील सखल भाग असलेल्या धाकतळे भागात अशाच प्रकारे एक दिवस अचानक विहिरीने पेट घेतला होता. त्यामुळे वास्कोत खळबळ माजली होती. या गावातही डोंगरमाथ्यावरील इंधन वाहिनीला गळती लागल्याने इंधन जमिनीत झिरपले होते. तशाच प्रकाराची पुनरावृत्ती आता माटवे दाबोळीत घडलेली आहे. लोकांना आधीच अंदाज आल्याने सुदैवाने कोणताही वाईट प्रसंग घडलेला नाही. धाकतळेत पहिल्या घटनेनंतर हळुहळु जमिनीतील प्रदूषण संपले होते. मात्र, तब्बल दहा वर्षांनंतर इंधनाच्या भूमिगत वाहिनीला महामार्गाच्या कामाच्यावेळी ठेच लागल्याने पुन्हा मोठी इंधन गळती होऊन धाकतळेतील वाहिरी आणि ओहोळातून नाफ्ता वाहू लागला होता. याच ओहोळात आगीचा भडका उडून या गावातील तिघां मुलांवर मृत्यू ओढवला होता, तर काहीजण जखमी झाले होते. माटवे दाबोळीतील घटनेमुळे जुन्या घटनेला उजाळा मिळालेला असून लोकांमध्ये पुन्हा भीती निर्माण झालेली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article