तालुक्यात भात-ऊस पिकांवर किडीचा प्रादुर्भाव
खानापूर : खानापूर तालुक्यात यंदा भात लागवड 31,230 हेक्टर तर ऊस लागवड 18,160 हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. यावर्षी 2025-26 च्या मान्सून हंगामात समाधानकारक पावसामुळे खानापूर तालुक्यातील मुख्य पिके भात व ऊस उत्तम वाढीच्या अवस्थेत आली आहेत. मात्र सततचा पाऊस, उष्ण वातावरण व दमट हवामानामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढीस अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार भात पिकात ब्राऊन प्लांट हॉपर (बीपीएच) व बॅक्टेरियल ब्लाइट तर उसात पांढरी लोकरी (मावा) गंभीर स्वरूपात दिसून येत आहे.
यासाठी उपाययोजना म्हणून भात पिकासाठी ब्राऊन प्लांट हॉपरवर नियंत्रणासाठी ट्रायफ्लुमेझोपायरिन 10 एससी 0.5 मिली/लिटर किंवा फ्लोनिकामिड 50 डब्ल्यूजी 0.3 ग्रॅम/लिटर आणि बॅक्टेरियल ब्लाइटसाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 डब्ल्यूपी 2.5 ग्रॅम/लिटर आणि स्ट्रेप्टोसायक्लिन 0.25 ग्रॅम/लिटर वापर करावा. तसेच उसासाठी पांढरी लोकरी (मावा) नियंत्रणासाठी थायामेथोक्सम 75 एसजी 0.3 ग्रॅम/लिटर किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 एसएल 0.4 मिली/लिटर घालून नियंत्रणात आणावे. शेतकऱ्यांनी या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे आवाहन कृषी खात्याचे साहाय्यक निर्देशक सतीश माविनकोप यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या संपर्क केंद्राशी संपर्क साधावा.