सरमळे - शितपवाडी शाळेत विज्ञान अध्यापनातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास
ओटवणे प्रतिनिधी
शाळा कितीही लहान तसेच अतिदुर्गम भागात असली तरी तिथे मुले घडविण्याचे महान कार्य सुरू असते. मंदिराची आपण शोभा वाढवितो त्याचप्रमाणे शिक्षणाला महत्त्व देऊन शाळेचेही वैभव वाढविले पाहिजे. याचप्रमाणे सरमळे गावात दुर्गमस्थानी असलेल्या धनगर बांधवांच्या शितपवाडी शाळेतील शिक्षक आनंददायी कृतियुक्त विज्ञान अध्यापनातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधत आहेत. त्यामुळे या दुर्गम शाळेतील मुले आज विज्ञान प्रयोग सादर करतानाच आत्मविश्वासाने बोलत आहेत.आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये शिक्षणासोबतच व्यक्तिमत्व विकास महत्त्वाचा असून त्याचे बाळकडू विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच देणे गरजेचे आहे. परंतु दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थी यापासून वंचित राहतात. मात्र उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षक असेल तर विद्यार्थी कितीही दुर्गम भागातील असले तरीही योग्य मार्गदर्शनाद्वारे त्यांचा व्यक्तिमत्व विकास साधला जाऊ शकतो.सरमळे - शितपवाडी शाळेतील विज्ञानप्रेमी शिक्षक दत्ताराम सावंत यांच्या संकल्पनेतून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडविणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे शीतपवाडी शाळेतील विद्यार्थी आत्मविश्वासाने बोलत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील शाळा असूनही या मुलांची गुणवत्ता वाखाण्याजोगी आहे. विद्यार्थी आत्मविश्वासाने विज्ञान प्रयोग सादर करताना प्रयोगाचा वैज्ञानिक दृष्टिकोनही समजावून सांगत आहेत. या नवोपक्रमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. शाळेच्या या उपक्रमांसाठी सहाय्यक शिक्षक सुदाम वाघेरा यांच्या सहकार्यासह केंद्रप्रमुख प्रमोद पावसकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. शिक्षकांच्या या नवोपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेला विज्ञाननिष्ठ बदल व व्यक्तिमत्त्व विकास या दुर्गम भागातील शाळेला गुणवत्तेकडे नेणारा आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षकांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक होत आहे.