ज्याची देहबुद्धी शाबूत असते तो त्याच्या स्वभावाप्रमाणेच वागत असतो
अध्याय तिसरा
भगवंत म्हणाले, चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेऊन सर्व कर्मे मला समर्पण करून आशारहित, ममतारहित आणि शोकरहित होऊन युद्ध कर. जे माझ्यावर श्रद्धा ठेवतील आणि मी सांगितल्याप्रमाणे आचरण करतील, ते कर्माच्या बंधनापासून मुक्त होतील. मात्र माझ्या उपदेशाकडे दुर्लक्ष करून जे माझा मत्सर करतात, माझ्या सांगण्याची हेटाळणी करून, मी सांगितल्याप्रमाणे वागत नाहीत, ते मूढ, अविवेकी आणि भ्रष्ट असल्याने त्यांचे पतन होते. ते मायेच्या आधीन झालेले असल्याने, इंद्रियांनी दाखवलेल्या आकर्षणांना बळी पडतात. म्हणून मी सांगितलेला विचार अज्ञानी लोकांच्या पचनी पडत नाही. अर्थात असे लोक परमार्थ साधनेच्या विरुद्ध असल्याने, त्यांच्याशी आत्मज्ञानासंबंधी कांही बोलू नये. ज्याप्रमाणे पतंग दिव्याच्या प्रकाशाला सहन करू शकत नाही, त्याप्रमाणे अशा लोकांना माझा उपदेश सहन होत नसल्याने ते तो मानत तर नाहीतच उलट, त्याची निंदा करू लागतात. पतंगाने जर दिव्याला आलिंगन दिले, तर त्याचक्षणी त्याचे मरण ओढवते, त्याप्रमाणे माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून जे विषयांचा उपभोग घेतात ते स्वत:चा नाश करून घेतात.
भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे वागून स्वत:चे कल्याण करून घेणारे आणि त्यांच्या सांगण्याकडे साफ दुर्लक्ष करून स्वत:चा नाश करून घेणारे असे माणसांचे दोन प्रकार आपण पाहिले. माणसांचा आणखी एक प्रकार असतो तो असा, ह्या लोकांना असं वाटतं की, आपण धर्मशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आपल्याला चांगले काय आणि वाईट काय हे बरोबर समजते म्हणून आपण वागतोय ते योग्यच आहे. मात्र वस्तुस्थिती अशी नसते. जोपर्यंत माणसाची देहबुद्धी शाबूत आहे तोपर्यंत त्याला मी कर्ता आहे असेच वाटत असते. मग तो कितीही शिकलेला असो. ज्याची देहबुद्धी शाबूत असते तो त्याच्या स्वभावाप्रमाणेच वागत असतो.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, ज्ञानी मनुष्यसुद्धा स्वत:ला कर्ता समजत असल्याने त्याच्या स्वभावाच्या अधीन होऊन वागत असतो आणि स्वभाव बदलणे सोपे नसल्याने, मी माझ्या स्वभावाला बदलून दाखवीन ह्या त्याच्या म्हणण्याला काही अर्थ उरत नाही.
ज्ञानी हि वागतो त्याच्या स्वभावास धरूनिया । स्वभाव-वश ही भूते बलात्कार निरर्थक ।। 33 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, जाणकार, शहाण्या माणसाचा आपल्याला चांगलं काय वाईट काय, हे सगळं काही कळतं, असा गैरसमज असतो. त्या भ्रमात राहून, तो इंद्रिये माझ्या ताब्यात असल्याने गरजेनुसार मी स्वभावात आवश्यक ते बदल करीन हे गृहीत धरून इंद्रियांचे काहीवेळा लाड करू पाहतो. त्यांना ढील देऊ पाहतो पण त्याने असे गंमत म्हणून देखील करू नये कारण स्वभावात बदल घडवून आणणे दुरापास्त असते. इंद्रियांनी दाखवलेल्या प्रलोभनांना बळी पडणे म्हणजे विषारी सर्पाबरोबर खेळण्याइतके किंवा वाघाची संगत करण्याइतके घातक आहे.
सुदैवाने हे जरी लक्षात आले तरी त्यामुळे सावध होऊन माणसाची वागणूक घडेलच असे नाही कारण माणसाला त्याच्या स्वभावानुसार वागल्याशिवाय रहावत नाही. शिकलेला मनुष्य अतिशय कष्ट करून मिळवलेली संपत्ती, समृद्धी खर्च करून, त्याच्या स्वभावानुसार शरीराचा नाश करून घेत असतो. देहाचे चोचले पुरवणे हे उघड उघड मोठे नुकसान असल्याने मनुष्याने स्वभावात आवश्यक ते बदल करून इंद्रियांनी दाखवलेल्या प्रलोभनांना बळी न पडण्यातच त्याचे भले आहे.
क्रमश: