मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्यास जेरबंद
वाई :
वाई तालुक्यातील धोम येथील प्रसिद्ध अशा नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटीतील सहा हजार रुपये चोरुन नेल्याची घटना घडल्याने धोममध्ये खळबळ उडाली होती. वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच वाई पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने या चोरीतील भोर तालुक्यातील टिटेघर येथील सचिन आनंदा नवघणे यास अटक केली. त्यास वाई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती वाई पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 16 जून रोजी वाई तालुक्यातील धोम येथील नवनाथ दत्त मंदिरात चोरट्याने दानपेटीतील 6 हजार रुपये चोरुन नेले होते. त्याबाबची तक्रार वाई पोलीस ठाण्यात झाली होती. वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी डीबी पथकास या गुह्याचा तपास करण्यास सूचना दिल्या होत्या. डीबी पथकाने धोम येथील नवनाथ दत्त मंदिर तसेच धोम गावातील सिसीटीव्हीची पाहणी केली. तेव्हा सिसीटीव्हीत चोरीची घटना कैद झाली होती. त्या अनुषंगाने शोध वाई पोलिसांनी घेतला असता सीसीटीव्हीतील संशयित व्यक्ती ही भोर तालुक्यातील टिटेघर येथील सचिन आनंदा नवघणे असल्याचे स्पष्ट झाले. त्यास अटक करुन वाई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता मंदिरातील दानपेटीतील 6 हजार रुपये हस्तगत केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, वाईचे डीवायएसपी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज, हवालदार अजित जाधव, पो. कॉ. श्रावण राठोड, पो. कॉ. हेमंत शिंदे, पो. कॉ. नितीन कदम, पो. कॉ. विशाल शिंदे, पो. कॉ. राम कोळी, पोलीस कॉ. अजित टिके यांनी केली. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज हे करत आहेत.