गुप्त माहिती पाकिस्तानला पुरविल्याप्रकरणी आणखी एकाला अटक
प्रतिनिधी/ बेंगळूर
भारतीय नौदलाशी संबंधित गुप्त माहिती पाकिस्तानला पुरविल्याबद्दल आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अलिफ इस्लाम (वय 21) असे त्याचे नाव असून तो मुळाचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. त्याच्यावरील कारवाईमुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या चारवर पोहोचली आहे.
उडुपी जिल्ह्यातील माल्पे येथील कोचीन शिपयार्डच्या कर्मचाऱ्यांनी भारतीय नौदलाशी संबंधित विविध गुप्त माहिती पाकिस्तानला पुरविल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. अटकेतील आरोपी अलिफ इस्लाम हा केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील मरायू गावात वास्तव्यास होता. तो बांगलादेशी नागरिक असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात यापूर्वी 21 डिसेंबर 2025 रोजी गुजरातमधील हिरेंद्र कुमार, तसेच 21 नोव्हेंबर 2025 रोजी उत्तर प्रदेशातील रोहित आणि संत्री यांना अटक करण्यात आली होती. या आरोपींनी व्हॉट्सअॅप आणि फेसबुकद्वारे पाकिस्तानला नौदलाच्या जहाजांच्या संख्येची गोपनीय माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी माल्पे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता, अलिफ इस्लाम याच्या अटकेमुळे प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. उडुपी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे. आणखी एका मुख्य आरोपीचा शोध घेतला जात आहे.
कोचीन शिपयार्ड ही भारतीय नौदलासाठी टग बनवणारी कंपनी आहे. ती केवळ नौदलासाठीच नव्हे तर खासगी कंपन्यांसाठीही जहाजे बनवते. कंपनीचे मुख्यालय केरळमध्ये आहे.