अतिथी शिक्षकांच्या भरतीला अनुमती
शालेय शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांचे उत्तर
बेळगाव : सरकारी शाळांमध्ये वीज, शौचालय, पिण्याचे पाणी, कुंपण व खेळाच्या मैदानासह पायाभूत सुविधा पुरविणे आणि इमारतींची दुरुस्ती व विकासासाठी आवश्यक अनुदान दिले जात आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी सर्व सरकारी शाळेतील मुलांना बूट, सॉक्स वितरणासाठीही अनुदान मंजूर झाले असून वितरणाची प्रक्रियाही पूर्ण झाल्याचे शालेय शिक्षणमंत्री एस. मधू बंगारप्पा यांनी सांगितले. गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात हुबळी-धारवाडचे आमदार महेश टेंगिनकाई यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना शिक्षणमंत्र्यांनी वरील माहिती दिली. हुबळी-धारवाड केंद्र विधानसभा मतदारसंघातील सरकारी प्राथमिक व प्रौढ शाळेत रिक्त पदांसाठी अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्यास अनुमती देण्यात आली आहे. अर्थसंकल्पाच्यावेळी केलेल्या घोषणेनुसार शिक्षकांची पाच हजार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरकारी शाळेत स्मार्ट क्लास, कॉम्प्युटर लॅब, इंटरनेट सुविधा पुरविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.