नोकरभरती प्रकरणात आरोग्यमंत्र्यांना सहभागी करून घेण्यास परवानगी
शैलेंद्र वेलिंगकर यांची याचिका : 2022 चे नोकरभरती प्रकरण
पणजी : सरकारच्या आरोग्य विभागात आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) 2022 च्या नोकरभरती विरोधात शैलेंद्र वेलिंगकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत राज्य आरोग्यमंत्र्यांना सहभागी करून घेण्यास उच्च न्यायालयाने परवानगी देण्यात आली आहे. पुढील सुनावणी 28 जुलै रोजी आहे. आरोग्य विभागात आणि गोमेकॉच्या 1,372 उमेदवारांच्या भरतीला आव्हान देण्राया 2022 च्या जनहित याचिकेत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना सहभागी करून घेण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या नियुक्त्यांना आव्हान देणाऱ्या शैलेंद्र वेलिंगकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत सुधारणा करण्यासही उच्च न्यायालयाने परवानगी दिली असून नवीन कारणे समाविष्ट करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
याचिकेच्या मागील 5 मे रोजी झालेल्या सुनावणीवेळी अतिरिक्त सरकारी वकील मारिया कुरैय्या यांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतली होती. मात्र, सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी सरकारतर्फे कोणीही प्रतिनिधित्व करण्यास नसल्याने न्यायालयाने याचिकादाराच्या अर्जाला कुठलाही विरोध नसल्याची नोंद केली. त्यानंतर न्यायमूर्ती भारती डांगरे आणि निवेदिता मेहता यांच्या खंडपीठाने याचिकेत सुधारणा करण्याची आणि राणे यांना सहभागी करून घेण्याची परवानगी दिली. न्यायालयाने सरकारला दोन आठवड्यांच्या आत सुधारित भागाबाबत उत्तर दाखल करण्याची परवानगी देताना पुढील सुनावणी 28 जुलै ठेवली आहे.