For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुन्हा दाखल करण्यास मागितली परवानगी

10:51 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुन्हा दाखल करण्यास मागितली परवानगी
Advertisement

मंत्री हेब्बाळकर यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया निवडणूक विभागाकडून केली जात आहे. यासाठी न्यायालयीन परवानगी मिळविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज केला आहे. आचारसंहिता असूनही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अंगणवाडी आणि आशा पर्यवेक्षकांची बैठक बोलाविली होती. यावरून भाजपकडून बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी शकील अहम्मद यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. यावरून जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बोलविलेल्या बैठकीच्या ठिकाणी अचानक भेट देऊन पाहणी केली. यादरम्यान निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याचे निदर्शनास आले. आचारसंहिता जारी झाल्यानंतर राजकीय कार्यक्रमांसाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. असे असताना मंत्री हेब्बाळकर यांनी आशा व अंगणवाडी पर्यवेक्षकांची बैठक बोलाविली होती. यावरून सदर कारवाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान सदर पर्यवेक्षक आढळून आल्याने ही कारवाई करण्यात येत आहे.

न्यायालयीन परवानगीनंतर गुन्हा दाखल करणार

निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी न्यायालयाकडून परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला आहे. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल.

- नितेश पाटील,

जिल्हा निवडणूक अधिकारी समस्या सांगण्यासाठी आपल्याकडे धाव

अंगणवाडी कार्यकर्त्या व आशा कार्यकर्त्या त्यांच्या समस्या घेऊन आपल्याकडे आल्या होत्या. त्यांच्यावर कामाचा भार वाढत असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सांगण्यासाठी त्या आपल्याकडे आल्या होत्या. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी भेट दिली. दरम्यान, आपल्यावर कोणती कारवाई केली जाईल ते पाहिले जाईल.

- मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

भाजप ग्रामीण अध्यक्ष धनंजय जाधव यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

Advertisement

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असताना महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग घेत आहेत. अंगणवाडी व आशा पर्यवेक्षकांची बैठक घेऊन आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, अशी तक्रार बेळगाव ग्रामीण भाजपचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी ग्रामीण निवडणूक साहाय्यक अधिकाऱ्यांकडे केली आहे. मंत्री हेब्बाळकर यांनी आचारसंहितेचे उल्लंघन करून अंगणवाडी व आशा पर्यवेक्षकांची बैठक घेतली. त्यांना ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था केली. आचारसंहिता असताना आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे. सरकारी यंत्रणेचा उपयोग करून घेतला जात आहे. निवडणूक काळात अशा प्रकारांना थारा देऊ नये. राज्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाकडून यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. निर्भय वातावरणात निवडणूक प्रक्रिया राबविणे गरजेचे असताना सत्ताधारी पक्षाकडून अधिकाराचा वापर करून अंगणवाडी व आशा पर्यवेक्षकांवर दबाव आणला जात आहे. मंत्री  हेब्बाळकर यांच्याकडून आदर्श आचारसंहितेच्या तत्त्वांचे उल्लंघन केले जात आहे. हा गंभीर गुन्हा आहे. त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा आणि प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.