चिन्नास्वामीवरील सामन्यासाठी परवानगी नाही
बेंगळूर शहर पोलीस आयुक्त सीमंतकुमार यांचे स्पष्टीकरण
बेंगळूर : विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेनिमित्त बेंगळूरच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर बुधवारी होणाऱ्या दिल्ली आणि आंध्र प्रदेश यांच्यातील सामन्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही, असे बेंगळूर शहर पोलीस आयुक्त सीमंत कुमार यांनी स्पष्ट केले. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने सरकार आणि बेंगळूर पोलिसांना प्रेक्षकांशिवाय सामना खेळवण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. दरम्यान, ग्रेटर बेंगळूर प्राधिकरण, पोलीस खात, अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने चिन्नास्वामी स्टेडियमला भेट देऊन त्याची पाहणी केली. स्टेडियममध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत. तसेच दिल्ली संघाकडून विराट कोहली खेळत आहे. जरी प्रेक्षकांना मैदानात प्रवेश नाकारले गेले तरी चाहते स्टेडियमजवळ जमण्याची शक्मयता आहे. त्यामुळे सामना आयोजित करणे योग्य नाही असा निर्णय शिष्टमंडळाने घेतला आहे, अशी माहिती पोलीस खात्याकडून मिळाली आहे. तथापि, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने अद्याप पर्यायी स्टेडियमबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.