गणेशोत्सवासाठी रात्री १२ पर्यंत परवानगी : पालकमंत्री
मिरज-सांगली :
शासनाने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजन पडेल, असे कृत्य केले जाणार नाही. गणेशोत्सवासाठी आत्तापर्यंत रात्री दहापर्यंत देण्यात आलेली मुदत वाढवून ती १२ वाजेपर्यंत करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना दिली. याबाबत आपण जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना योग्य ते सुचित करु, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या घरी गणेश आरतीसाठी हजेरी लावली. त्यांच्या समवेत आमदार सुरेश खाडे, श्रीमती जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, आनंदा देवमाने, डॉ. महादेव कुरणे, डॉ. पंकज म्हेत्रे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अपर्णा मोरे धुमाळ, उपायुक्त स्मृती पाटील, अजित सुर्यवंशी, प्रविण धेंडे अशा अनेकांनी हजेरी लावली होती. माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम, पत्नी सौ. हेमलता कदम, जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि अमित कदम कुटुंबियांनी पालकमंत्र्यांसह मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शुक्रवारी रात्री दहा वाजता सांगली शहरातील मंडळांचे देखावे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी बंद पाडले. पोलिस प्रमुखांच्या आदेशाप्रमाणे दहा वाजता देखावे बंद करावे लागतील असा त्यांचा आग्रह होता. तर लोक नऊ वाजता बाहेर पडतात. प्रत्येक मंडळासमोर शेकडो लोकांची रांग आहे. बारा वाजेपर्यंत देखावे चालू ठेवावेत अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही.
अखेर पटेल चौक मंडळाजवळ अजित सुर्यवंशी, सावकार मंडळाचे अजिंक्य पाटील, लक्ष्मी नारायणचे हेमंत काब्रा, गजेंद्र मंडळाचे नितिन शिंदे, वि जयंतचे पृथ्वीराज पवार, नव हिंदचे शंभुराज काटकर, झाशी चौकचे उदय टिकारे, मोटर मालकचे शितल खंजिरे यांच्यासह अनेक मंडळाच्या अध्यक्षांनी या निर्णयाला विरोध करण्याचे ठरवले. त्यानुसार पालकमंत्र्यांना भेटण्याची जबाबदारी अजित सुर्यवंशी व इतर कार्यकत्यांवर सोपवण्यात आली होती.
सांगली-मिरजेसह जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे. अनेक मोठ्या मंडळांनी आकर्षक आणि प्रबोधनपर देखाव्यांना प्राधान्य दिले आहे. पण न्यायालयाने सार्वजनिक मंडळांना रात्री दहापर्यंतची मुदत घातल्याने नागरिकांसह कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजन पडत आहे. नागरिक रात्री नऊनंतर देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडतात आणि दहा वाजता देखावे बंद झाले तर सर्वत्र नाराजीचा सूर निर्माण होईल, हा विचार करुन मंडळांना देखावे सुरू ठेवण्यासाठी रात्री १२ पर्यंत मुदत देण्यात आली असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी जाहीर केले. याबाबत जिल्ह्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपण बोलू, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला. त्यामुळे राज्यात यावर्षी उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पण न्यायालयाच्या आदेशामुळे रात्री दहानंतर देखावे बंद करणे प्रशासनाला भाग पडत आहे. याबाबत सर्वत्र नाराजीचा सूर उमटू लागल्याने आम्ही श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली अजित सुर्यवंशी यांच्यासह पंकज म्हेत्रे, बबलू मेंढे, नाना हलवाई यांसह अनेक कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन उत्सवाला मुदतवाढ देण्याची मागणी केली. ती मान्य करुन पालकमंत्र्यांनी १२ पर्यंत उत्सव साजरा करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे हातगाड्या, पानटपऱ्या यांच्यासह खाद्यपदार्थांच्या गाड्यांनाही रात्री १२ पर्यंत मुदत मिळाली असल्याची माहिती जनसुराज्य चे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी यावेळी दिली.
श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी याबाबत पालकमंत्र्यांचे आभार मानताना या गणेशोत्सवासाठी गेल्या तीन-चार महिन्यांपासून झटणाऱ्या कार्यकर्त्यांचे यश आहे. त्यांच्या प्रयत्नाला न्याय मिळाला. आता त्यांनी अथक प्रयत्नातून सादर केलेले देखावे नागरिकांनाही रात्री १२ पर्यंत पहावयास मिळणार आहेत. याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि हा उत्सव शांततेत साजरा करावा, असे आवाहन केले.