खासबाग येथील आठवडी बाजारात अखेर कायमस्वरुपी आरेखन
बेळगाव : खासबाग येथील आठवडी बाजाराला शिस्त लावण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. महापालिका व पोलीस खात्याच्यावतीने भाजी विक्रेत्यांसाठी कायमस्वरुपी आरेखन करण्यात आले. शनिवारी यासाठी नगरसेवक रवी साळुंखे आणि शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सिमानी यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे व्यापारी व स्थानिक रहिवाशांतून समाधान व्यक्त करण्यात आले. बसवेश्वर चौक, खासबाग परिसर, बॅ. नाथ पै चौक, शहापूरपर्यंतच्या मुख्य मार्गावर दर रविवारी आठवडी बाजार भरतो. या ठिकाणी शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील विविध भागातून शेतकरी येतात.
त्यामुळे वाहतूक कोंडीसह भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढला होता. वारंवार पाकीटमारीच्या घटनासह महिलांचे दागिनेही पळविण्यात येत होते. त्यामुळे नगरसेवक रवी साळुंखे यांनी आठवडी बाजाराला शिस्त लागावी यासाठी महानगरपालिकेकडे पाठपुरावा चालविला होता. यापूर्वी महानगरपालिकेकडून तात्पुरते आरेखन केले जात होते. पण कायमस्वरुपी आरेखन करण्यात यावे यासाठी नगरसेवक रवी साळुंखे यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. त्या प्रयत्नांना अखेर यश आले असून शनिवारी खासबाग आठवडी बाजारात कायमस्वरुपी आरेखन करण्यात आले. दर रविवारी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत या ठिकाणी मोठी गर्दी होत असते.