अनाथ दिव्यांग मुलांसाठी कायमस्वरूपी वसतिगृह
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सांखळीत घोषणा
पणजी : उत्तर गोव्यात आणि दक्षिण गोवा या दोन्ही ठिकाणी राज्य सरकारमार्फत पुढील चार ते पाच वर्षांत अनाथ दिव्यांग मुलांसाठी कायमस्वरूपी वसतिगृह बांधण्याचा विचार सुरू आहे. दिव्यांग मुलांना कोणताच त्रास होऊ नये, यासाठी राज्य सरकारमार्फत तसा विचार करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या 4 ते पाच वर्षांत दिव्यांग मुलांसाठी कायमस्वरूपी वसतिगृह बांधण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. सांखळी येथील दिव्यांग व्यक्तींसाठी काल सोमवारी आयोजित केलेल्या मूल्यांकन शिबिराच्या समारोप सोहळ्यात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. दिव्यांग व्यक्तींना मदत म्हणून उपकरणे खरेदी, सहाय्य योजना देण्यात येतात. दिव्यांग मुलांच्या पालकांना अनेक अडथळ्यांतून वाट काढावी लागते. त्यांच्या अडचणी, समस्या दूर व्हाव्यात यासाठी या मूल्यांकन शिबिराला अधिक महत्त्व आहे. ज्या दिव्यांग मुलांचे पालक आहेत त्यांना फारसा विचार करण्यासारखे काही नसते. परंतु ज्या दिव्यांग मुलांना पालकच नाहीत, अशा अनाथांवर खूप वाईट वेळ येते. या मुलांना आणखी त्रास होऊ नये, यासाठीच त्यांच्यासाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.