जानवली अपघातातील पसार कार सापडली
शिरगांव चेकपोस्ट येथील पोलिसांची कामगिरी ; देवगड पोलिसांनी चालकास दिले कणकवली पोलिसांच्या ताब्यात
अपघातात दुचाकीस्वार विवाहितेचा झाला होता मृत्यू
कणकवली : वार्ताहर
महामार्गावरील जानवली- परबवाडी येथे दुचाकीस्वार सौ. अंजली अमित साळवी (वय ३६, कणकवली - शिवाजीनगर) यांच्या दुचाकीला धडक देऊन पसार झालेला इनोव्हा चालक अवधूत मनोहर दुवाळी (२१, रा. जामसंडे, ता. देवगड) याला शिरगांव चेकपोस्ट येथील पोलिसांनी गुरुवारी रात्री १०.३० वा. सुमारास ताब्यात घेतले. त्यानंतर देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी संशयितास रात्री उशिरा कणकवली पोलिसांकडे सुपूर्द केले. गुरुवारी सायंकाळी ५.४५ वा. सुमारास झालेल्या या अपघातात अंजली मृत्यूमुखी पडल्या होत्या. तर अपघातानंतर कारचालकाने कारसह पलायन केले होते.
अपघातानंतर कणकवली पोलिसांनी जिल्हाभरातील चेकपोस्टशी संपर्क साधला होता. रात्री १०.३० वा. सुमारास एमएच ०७ क्यू ७८९४ या क्रमांकाची इनोव्हा कार शिरगांव चेकपोस्ट येथे आली. कारचा पुढील भाग अपघातग्रस्त दिसल्याने चेकपोस्टवर ड्युटीस असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. डगरे यांनी चौकशी केली. मात्र, चालक अवधूत दुवाळी विसंगत माहिती देत असल्याने त्यांनी देवगड पोलीस निरीक्षक श्री. बगळ यांना कळविले. बगळे यांच्या तपासणीत सदरची कार जानवली अपघातातील असल्याचे निष्पन्न झाले. अपघाताबाबत कारचालक दुवाळी याच्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. गाडेकर करीत आहेत.